28 January 2021

News Flash

रोजच्या ५० लाख लिटर दुधाचे करणार काय?

दूध उत्पादक अडचणीत

प्रदीप नणंदकर

करोना प्रादुर्भावाच्या भीतीने निर्माण झालेल्या संकटाचा फटका राज्यातील दूध उत्पादकांना सहन करावा लागत असून सरासरी सव्वा ते दीड कोटी लिटर दररोज दुधाची विक्री होते. त्यापैकी केवळ ५० लाख लिटरच दूध खरेदी करून त्याची विक्री केली जाऊ लागली आहे. दररोज ५० लाख लिटरपेक्षा अधिकचे दूध गावोगावी पडून असल्याने दूध उत्पादक अडचणीत सापडला आहे.

पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर अशा शहरांना ग्रामीण भागातून दूध पुरवठा केला जातो. गेल्या आठवडाभरापासून लॉकडाऊनच्या स्थितीमुळे अत्यावश्यक सेवेत गणल्या जाणार्या दुधालाच फटका सहन करावा लागतो आहे. शहरातील हॉटेल बंद झाल्याने चहा, कॉफीसाठी लागणारे हजारो लिटर दूध विकले जात नाही याशिवाय मिठाईचे दुकानेही बंद असल्याने त्यातील विकले जाणारे दूधही बंद आहे.

थंड पदार्थ खाऊ नयेत अशा सूचना दिल्या जात असल्याने लस्सी, आईस्क्रीम, श्रीखंड हे पदार्थही विक्रीविना पडून असल्याने नव्याने उत्पादीत करता येत नाहीत त्यामुळे दूध उत्पादकांना उत्पादीत केलेल्या दुधाचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नॅचरल दूध डेअरीचे प्रमुख बी. बी. ठोंबरे हे परिसरातून दररोज ६० हजार लिटर दूध गोळा करून त्याची विक्री करतात. गेल्या आठवडाभरापासून दरराज केवळ ३० हजार लिटरच दूध कसेबसे ते घेत आहेत. घेतलेले दूधही विकायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक जिल्हय़ाच्या जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने त्यांच्या मनाला येईल तसे नियम केल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

बीड जिल्हय़ाच्या जिल्हाधिकार्यानी सकाळी ९.३० पर्यंतच वाहनांना रस्त्यावर फिरण्यास परवानगी दिली व दुकाने उघडे ठेवायला परवानगी दिल्या. एवढय़ाच वेळात दूध विकावे लागते. दुधाची गाडी रस्त्यावर दिसली तर पोलीस चालकाला मारहाण करतात त्यामुळे दुधाची गाडी घेऊन जायला चालक तयार नाहीत. मुळात कोरोनाच्या भीतीने निम्मे कर्मचारीच काम करतात. खेडेगावातून दूध आणताना वाटेत पोलीस प्रशासनाच्या बिनडोक कारभाराचा त्रास दुधाची वाहतूक करणार्याना सहन करावा लागतो आहे. औसा तालुक्यातील मंगरूळ गावातील तेरणा दूध संकलन केंद्राचे प्रमुख अमर बिराजदार हे दररोज १ हजार लिटर दूध गोळा करून डेअरीला पाठवतात. आता ते केवळ ५०० लिटर दूध गोळा करत आहेत. गायीच्या दुधाला ३२ रुपये मिळणारा भाव आता १९ रुपये लिटर मिळत असून म्हशीच्या दुधाचा भाव ३८ रुपयांवरून ३० रुपयांवर घसरला आहे. दूध विकले जात नसल्याने भाव कमी करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात पुणे, मुंबईहून मोठय़ा प्रमाणावर लोक आपल्या गावी परतले आहेत. दूध खरेदी करताना त्यांच्यापासून संसर्ग तरी होणार नाही ना याची भीतीदेखील दूध संकलित करणार्या लोकांना वाटत आहे.

सोनाई, तिरुमला, डायनॅमिक अशा कंपन्यांनी दूध खरेदी करणे बंद केले आहे. कोल्हापूरच्या गोकूळ दूध उत्पादक संघात रोज १७ लाख लिटर दूध संकलित होऊन विक्री केले जाते. त्यांचे दूध संकलन केवळ १० लाख लिटर होत असून त्यापैकी ५ लाख लिटरची पावडर केली जात आहे. दुधाची पावडरही विकली जात नसल्याने दूध खरेदीला त्याचा फटका सहन करावा लागतो आहे.

दूध नासते आहे..

औसा तालुक्यातील मातोळा येथील प्रशांत भोसले हे दूध उत्पादक दररोज ८० लिटर दुधाची विक्री करतात. दुधाचा भाव कमी झाल्याने त्यांना रोज किमान दोन हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. निलंगा तालुक्यातील हासोरी बुद्रुक या गावात शंकर बरमदे हे रोज २५० लिटर दूध संकलित करतात, तर संतोष बरमदे हे १७५ लिटर दूध संकलित करतात. गेल्या आठवडाभरापासून दूधच उचलले जात नसल्याने संकलित केलेले दूध नासत असल्याचे सांगितले.

कोटय़वधी रुपयांचे नुकसान

आणखीन १५ दिवस राज्यातील लॉकडाऊन असाच सुरू राहणार असल्याने याकाळात कोटय़वधी रुपयांचे नुकसान दूध उत्पादकांना सहन करावे लागणार आहे. ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय आजच्या विचित्र स्थितीमुळे पुरता कोलमडून पडत असून यातून कसे सावरणार याची चिंता गावोगावच्या दूध उत्पादकांना लागून राहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 12:31 am

Web Title: what will you do with 50 lakh liters of milk daily abn 97
Next Stories
1 रायगडमध्ये डॉक्टर, व्हेंटिलेटर्सची कमतरता
2 संत्री भाववाढीचा दिलासा, पण औटघटकेचाच!
3 करोनाचा सामना करण्यासाठी ‘नाम’ने दिला १ कोटीचा निधी
Just Now!
X