मुंबईतील वक्तव्याने ‘शेतकरी दिंडी’च्या आठवणींना उजाळा

मोहन अटाळकर, अमरावती</strong>

डिसेंबर १९८० मध्ये विरोधी नेतेपदी असताना शरद पवार यांनी अमरावती नजीकच्या पोहरा येथे आंदोलन केले होते. या आंदोलनप्रकरणी त्यांना अटक झाली होती. पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना या आंदोलनाचा उल्लेख केला आणि ३९ वर्षांपूर्वीच्या ‘शेतकरी दिंडी’च्या आठवणी जाग्या झाल्या.

पवारांनी १९८० मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नागपूर विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ‘शेतकरी दिंडी’ काढली होती. ७ डिसेंबर १९८० रोजी जळगावहून निघालेली ही पायी दिंडी अमरावतीत पोहचल्यानंतर मोठी सभा झाली. त्यानंतर दिंडीचा मुक्काम चांदूर रेल्वेमार्गावरील पोहरा येथे होता. येथे शरद पवार यांच्यासह महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि अन्य नेत्यांना अटक झाली होती. या दिंडीमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्यानंतर शरद पवार यांची राजकीय कारकीर्द बहरली. कालांतराने जनतेने त्यांना कौल दिला व ते दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री, नंतर देशाचे संरक्षणमंत्री, कृषिमंत्रीही झाले.

पवार हे १९७८ मध्ये पुलोद आघाडी करून पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनले होते. इंदिरा गांधींनी केंद्रात सत्तेत आल्यानंतर पुलोद सरकार बरखास्त केले होते. १९८० मध्ये निवडणुकीनंतर काँग्रेस (आय) पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आला. ए.आर. अंतुले हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर काही महिन्यांतच सर्व डाव्या पक्षांसोबत शरद पवार आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. १९८० मध्ये नागपूर अधिवेशनादरम्यान जळगाव ते नागपूर पायी दिंडीचे नेतृत्व शरद पवार आणि सहकार नेते राजारामबापू पाटील यांनी केले होते. यामध्ये एन.डी. पाटील, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, बबनराव ढाकणे आदींनी सहभाग घेतला होता, अशी आठवण सांगितली जाते.

दिंडीत कापूस, ऊस, कांद्याचे दर, शेतमजुरांची रोजंदारी आदी विषय होते. त्या वेळी कापसाचा ४०० रुपये प्रतिक्विंटल भाव ५०० रुपये करावा, अशी मोर्चेकऱ्यांची मागणी होती. अमरावतीला पोहचेपर्यंत दिंडीत सहभागी होणाऱ्यांची संख्या लाखावर पोहचली. येथे  यशवंतराव चव्हाण, जॉर्ज फर्नाडिस हे दिंडीत सहभागी झाले होते. पोहरा येथे नेत्यांना अटक झाल्याने सरकारविषयी मोठा रोष निर्माण झाला होता. शरद पवार यांनी यापूर्वीही एक-दोन वेळा अमरावतीतील अटकेचा आणि जिल्ह्यातील जनतेने दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा उल्लेख करून कृतज्ञता व्यक्त केली होती.