धवल कुलकर्णी

टाळेबंदीमुळे आपल्या गावापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या फलटण मध्ये ५७ लोक अडकून पडले होते. मात्र राज्य शासनाने ऊसतोड मजुरांना आपापल्या गावी जाऊ देण्याबाबत निर्णय घेतल्यानंतर शेवटी हे ५७ ऊसतोड कामगार आपल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यामधल्या ध्वजापाणी पाड्यावर जाऊन पोचले.

आपण आपल्या घरी पोहोचल्यानंतर तरी सुखरूप असू ह्या त्यांच्या विश्वासाला लवकरच तडा जाणार होता. केवळ करोना व्हायरस बाबतच्या गैरसमजुतीतून गावकऱ्यांनी त्यांना इथे राहू दिले नाही. शुक्रवारी दिवसभर त्यांच्या मागे लागल्यानंतर रात्री तुम्ही गाव सोडून जा म्हणून त्यांना खूप त्रास देण्यात आला. शेवटी स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिसांमार्फत मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण तूर्तास तरी निवळले आहे.

लोकसंघर्ष मोर्चा च्या प्रतिभा शिंदे यांनी सांगितले की, “हे ऊसतोड मजूर साधारणपणे दीड ते दोन महिना फलटण ला होते. राज्य शासनाने ऊसतोड मजुरांना आपापल्या गावी जाऊ देण्याबाबत निर्णय घेतल्यानंतर कारखानदाराने योग्य त्या आरोग्य तपासण्या करून व गाडीची सोय करून त्यांना गावी पाठवले.”

फोटो सौजन्य प्रतिभा शिंदे

 

“हे लोक परवा मालदा गावातल्या आपल्या पाड्यावर जाऊन पोहोचले. पण केवळ करोना बाबतच्या भीती व गैरसमजुतीमुळे लोक त्यांना तिथे राहू द्यायला तयार होईनात. शुक्रवारी दिवसभर या मजुरांनी गाव सोडून जावं म्हणून सतत त्यांच्यामागे तगादा लावण्यात आला होता आणि रात्री तर त्यांना खूप त्रास देण्यात आला. शेवटी या लोकांनी लोकसंघर्ष मोर्चा शी संपर्क साधला आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांना हस्तक्षेप करायला लावल्यानंतर हे प्रकरण तात्पुरते का होईना निवळले आहे.”

“गावकऱ्यांच्या दृष्टीने जे बाहेर राहून परत आलेत ते करोना संशयित आहेत. त्यामुळे त्यांना ते गावात राहू देत नाहीत. या सगळ्याचे कारण असे आहे की लोकांचे नीट प्रबोधन झालेले नाही. आदिवासींना अशा रोगांची सवय किंवा माहिती नाही. हे लोक गावातलेच असल्यामुळे आणि त्यांच्याजवळ फोन नसल्यामुळे ते वाचले असेच म्हणावे लागेल नाहीतर पालघर सारखी एखादी घटना घडायला वेळ लागला नसता,” असे शिंदे म्हणाल्या.

नंदुरबार जिल्ह्यातील हजारो मजूर महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर येथे ऊसतोडणीसाठी गेलेले आहेत. लोकसंघर्ष मोर्चा ने अशा मजुरांची यादी तयार करून त्यांच्यातील प्रमुखांचे मोबाईल नंबर घेऊन ती यादी सरकारला दिली होती. त्याच बरोबर त्यांनी कारखानदारांना फोन करून मजुरांची लवकरात लवकर टेस्ट करून त्यांना गावी पाठवण्याची व्यवस्था करा सतत पाठपुरावा केला होता.