जो उद्योग आपल्याला रोजीरोटी देतो, तिथेच आंदोलकांनी धिंगाणा घातला. औरंगाबादमधील उद्योगांना असेच लक्ष्य केले तर इथे उद्योगधंदे आणायचे का, असा प्रश्न पडला असल्याची चिंता औरंगाबाद औद्योगिक वसाहतीच्या संघटनेने व्यक्त केली आहे. आज झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. आंदोलकांच्या आजच्या कृतीमुळे आमचे किती नुकसान झाले यापेक्षा आमचे मानसिक खच्चीकरण किती झाले हे पाहणे गरजेचे आहे. आमच्या गुंतवणुकीचे संरक्षण होणार नसेल तर आम्ही काय करायचे असा सवाल करत वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे शहराच्या औद्योगिक विकासावर परिणाम होईल असे म्हटले.
मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीत हिंसक वळण लागले. आंदोलकांनी सुमारे ५० कंपन्यांची तोडफोड करत पोलीस व्हॅन, अग्निशामक दलाची गाडी आणि ट्रक पेटवून दिला. जमावाने दगडफेक केल्याने पोलिसांना त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करावा लागला होता. औरंगाबाद हे ऑटोहब म्हणून ओळखले जाते. वाळूज ही मोठी औद्योगिक वसाहत आहे. इथे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद औद्योगिक संघटनेने रात्री उशिरा पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी उदयोजकांच्या मानसिकतेबाबत सर्व उद्योजकांनी भाष्य केले.
आंदोलनातील तोडफोडीमुळे दिसून न येणारे नुकसान भरपूर झाले आहे. मागच्या काही दिवसांपासून शहरामध्ये नकरात्मकता निर्माण होत आहे. उद्योगांना लक्ष्य केले जात आहे. हे उद्योगांना मान्य नाही. उद्योगावरही याचा परिणाम होऊ शकतो.
आरक्षणासाठी हे आंदोलन सुरू आहे. पण रोजगार हा सरकारपेक्षा उद्योगामध्ये जास्त मिळणार आहे. आम्ही नोकऱ्या देतो, तेव्हा आम्ही जात-पात न पाहता देतो. स्थानिक आणि सक्षम उमेदवारांना नोकरी देतो. जो उद्योग आपल्याला रोजीरोटी देतो. तिथेच हा धिंगाणा घातला जातो. आजच्या आंदोलनात सुमारे ५० ते ६० मोठ्या कंपन्यांवर तर १० छोट्या कंपन्यांवर हल्ला करण्यात आला. अक्षरश: शस्त्राचा धाक दाखवून हा हल्ला करण्यात आला. आमच्या कंपनीत काम करणाऱ्यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण झाले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2018 11:07 pm