माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या आज जयंतीदिनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला. राज्यपाल कोश्यारी यांच्यावर सध्या मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या एका पत्रामुळे टीकेचा भडिमार होत आहे. गृहमंत्री देशमुख यांनी ट्विटद्वारे राज्यपालांवर निशाणा साधला.

देशमुख म्हणाले, “थोर माणसं धर्माचा उपयोग मित्र वाढवण्यासाठी करतात, खुजी माणसं धर्माचा वापर करुन संघर्ष घडवतात” असं सांगणाऱ्या एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपतीपदाची उंची वाढवली. राष्ट्रपती-राज्यपाल ही संविधानिक पदे धर्म किंवा पक्षाशी बांधील नसल्याचे भान ठेवल्यानेच ते लोकप्रिय राष्ट्रपती ठरले.

देशमुख यांच्या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून अनेकांनी त्यांना पाठींबा तर काहींनी सल्लाही दिला आहे. राज्यपालांवर टीका करताना तुम्ही कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्याचं राहून गेल्याचं एका युजरनं त्यांना सांगितलं आहे.

‘‘हिंदुत्ववादी असूनही गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील देव-देवतांना टाळेबंदीत ठेवण्यात आले आहे. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात?’’ असा अजब सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे विचारला होता. त्यावर ‘‘तुम्हाला घटनेतील धर्मनिरपेक्षता मान्य नाही का?’’ असा सडेतोड प्रतिसवाल करत, माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे राज्यपालांना ठणकावले.