News Flash

VIDEO: कधी पांढरा कावळा बघितलाय का?; रत्नागिरीत ठरतोय चर्चेचा विषय

रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावात शेट्येवाडीत पांढरा कावळा आढळला

कावळा म्हटलं काळा रंग हे ठरलेलं आहे. पण सफेद कावळा असं कुणी म्हटलं तर विश्‍वास बसत नाही. पण पांढरा कावळा रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावात शेट्येवाडीत आढळला. शेखर शेट्ये यांनी निरीक्षण करुन ही वार्ता फोटो, व्हिडीओद्वारे सगळीकडे पाठवली. गेले चार दिवस शेखर शेट्ये यांच्या घराजवळ पांढर्‍या कावळ्याची हजेरी चर्चेचा विषय ठरला आहे.

काळबादेवी येथील शेखर शेट्ये यांच्या घराजवळ परिसरातील पक्षी झाडांवर आढळतात. चार दिवसांपूर्वी शेट्ये घराच्या बाजूला असलेल्या कोंबड्यांना खाणं घालत असताना काही कावळे तिथे आले. त्यात एक पांढरा पक्षी दिसला. दाणे टिपणारा तो पक्षी कबुतर असावे असे वाटले. थोडे कुतूहलाने त्यांनी त्याचे निरीक्षण केल्यावर तो कावळाच वाटला. त्या पांढर्‍या पक्षाची ठेवण, चोच आणि डोळा हा नेहमीच्या कावळ्यासारखाच होता. थोडावेळ थांबून त्यांनी आवाज ऐकला. तो कावळ्याचाच होता. शेखर यांनी ही बाब शेजारच्यांना सांगितली. त्यापैकी काहींनी छायाचित्रे) व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत.

पांढऱ्या रंगाचा कावळा क्वचितच आढळतो. त्यामुळे तो काळबादेवीकरांसाठीच नव्हे तर रत्नागिरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत शेखर म्हणाले की, दुसरा पक्षी आला की कावळे त्याला बोचून काढतात; मात्र हा पांढर्‍या रंगाचा पक्षी इतर कावळ्यांच्या जोडीने खाद्य खाण्यासाठी घराच्या जवळ निर्धास्त येत आहे. त्यामुळे तो त्यांच्यातलाच असावा, असा अंदाज आम्ही केला.

दरम्यान प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ प्रतीक मोरे यांनी सांगितले की, ही कोणतीही नवीन प्रजाती नसून अनुवंशिक स्थितीमुळे होणारे एक उत्परीवर्तन आहे. पक्षी, प्राणी आणि कीटक यांच्या शरीराचे रंग विशिष्ट द्रव्यांमुळे ठरतात. ही रंग द्रव्ये मेलानिन, कॅरेटीनोईड आणि पॉरफिरीनस या प्रकारची असतात. या तीनही रंगद्रव्यांची कमी-जास्त किंवा पूर्णपणे कमतरता पक्ष्यांची रंगसंगती ठरवते किंवा बिघडवू शकते. यापैकी मेलानिनचा अभाव, हा अनुवंशिक बदल आहे. अशा पक्ष्याला ‘ल्युसिस्टिक’ म्हणतात. या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पूर्ण पांढऱ्या रंगाची पिसे दिसून येतात आणि डोळ्यातील रंगद्रव्य नसल्याने आतील लाल रंगाच्या केशिकांचाही रंग डोळ्यांना येऊन ते लालसर दिसतात. या पक्ष्याची चोच आणि पायसुद्धा फिकट गुलाबी रंगाचे असतात. एकूण पक्षीसंख्येत अशा पक्ष्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याने ते दुर्मिळ गटात मोडतात. काळबादेवीतील कावळा या बदलाचा एक नमुना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 5:22 pm

Web Title: white crow is topic of discussion in ratnagiri sgy 87
Next Stories
1 निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे तौते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार : मुख्यमंत्री
2 “शरद पवारांचा नातू म्हणून रोहित पवारांना वेगळा न्याय का?”
3 म्युकरमायकोसिस : महाराष्ट्रातील औषध पुरवठ्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Just Now!
X