महाराष्ट्रासह पाच राज्यांतील करोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील उपनगरीय रेल्वे, रस्ते वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणली. त्यावर सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही कार्यालयीन कामकाजाच्या वेळेची पारंपरिक मानसिकता बदण्याची आवश्यकता असून वेगवेगळ्या वेळांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण आखावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी निती आयोगाच्या बैठकीत केली. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“१० ते ५ ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय? मंत्रालयात न जाता घरी बसून राज्याचा कारभार हाकणारे (????)मुख्यमंत्री. अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी… मग दुसऱ्यांना सल्ला द्या.” असं म्हणत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

निती आयोगाची सहावी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे सहभागी झाले होते. मुंबईत केंद्र सरकारची कार्यालये, बँका यांच्या वेळा बदलाव्यात, अशी मागणी करोना निर्बंध शिथिलझाल्यापासून करण्यात येत आहे.

कार्यालयीन वेळा बदलाव्यात

सरकारी कार्यालयांमुळे सकाळी आणि सायंकाळी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होते. ती टाळण्यासाठी केंद्राने आपल्या कार्यालयांच्या वेळा बदलण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली आहे.