राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नावाच्या महिलेने हा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात फेसबुक पोस्ट लिहून आपली बाजू मांडली होती. आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होतोय, असे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या एफबी पोस्टमध्ये म्हटले होते.
एकूणच या सर्व आरोपांमुळे धनंजय मुंडे यांची राजकीय परिस्थिती बिकट बनली आहे. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष शिवसेना आणि काँग्रेसही चार हात लांब राहत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान आज या प्रकरणात एक नाटयमय घडामोड घडली. भाजपाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना भाजपाच्याच एका नेत्याने रेणू शर्मा विरोधात पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. कृष्णा हेगडे असं या भाजपा नेत्याचं नाव आहे. एक प्रकारे अप्रत्यक्षपणे त्यांनी धनंजय मुंडे यांना मदतच केली.
“२०१० सालापासून रेणू शर्मा मला त्रास देत होती. वेगवेगळया फोन नंबरवरुन ती माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला प्रत्येकवेळी टाळत होतो. रेणू शर्मा माझ्या मागे लागली होती. तिला माझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायचे होते. ती मला हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवण्याचा प्रयत्न करत होती” असा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला आहे.
कोण आहेत कृष्णा हेगडे ?
कृष्णा हेगडे हे आता भाजपामध्ये असले, तरी ते मूळचे काँग्रेसचे आहेत. माजी आमदार असलेल्या कृष्णा हेगडे यांनी, काँग्रेसच्या तिकिटावर विलेपार्ल्यातून विधानसभेची निवडणूकही जिंकली होती. चार वर्षांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना कृष्णा हेगडे यांनी त्यावेळचे तत्कालिन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर निष्ठावंतांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला होता.
२००९ साली कृष्णा हेगडे यांनी विलेपार्ल्यातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०१४ साली भाजपाच्या पराग अळवणी यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर तीन वर्षांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे ते जावई आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2021 6:45 pm