राज्यभरात दुष्काळाची तीव्रता प्रचंड वाढली असताना चाऱ्याविना पशू व पाण्याविना जनतेला तडफडत ठेवण्याचे काम सरकारतर्फे केले जात आहे. हजारो टँकरची मागणी असताना जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश आणि त्यातील भ्रष्टाचार उघड होईल, या भीतीपोटी टँकरची मागणी पूर्ण केली जात नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सावंत म्हणाले की, राज्यात दुष्काळाची परिस्थिती पाहता दहा हजारांपेक्षाही अधिक टँकरची मागणी गावा-गावातून येत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या ५,१७४ टँकरने पाणी दिले जात आहे. गावातून आलेली मागणी लालफितीतच अडकवून ठेवण्याचे सरकारचे निर्देश असल्याचे समजते. गावा-गावात एका टँकरच्या मागे ग्रामस्थ पाण्यासाठी तुटून पडत असून हे चित्र अत्यंत विदारक आणि संतापजनक आहे. जलयुक्त शिवारमध्ये खर्च केलेले हजारो कोटी रुपये कोणाच्या घशात गेले हा प्रश्न जनता विचारेल म्हणूनच टँकरची मागण्या पूर्ण केली जात नाही, असा आरोप सावंत यांनी केला. जलयुक्त शिवारचे अपयश व त्यातील भ्रष्टाचाराची लक्तरे ही वेशीवर टांगली गेली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलयुक्त शिवार योजनेची स्तुती करताना राज्यातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचे म्हटले होते. पण त्यांच्या दाव्यातला फोलपणा सध्याच्या पाणीटंचाईवरून स्पष्ट होत आहे. लातूरमध्ये शेकडो कोटी रुपयांची कामे केल्यामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही असे सांगितले गेले होते. परंतु लातूरमध्येही परिस्थिती काही वेगळी नाही, असे सावंत म्हणाले.