संतोष मासोळे

धुळे महापालिका निवडणूक : ‘मिशन फिफ्टी प्लस’साठी भाजपची दमछाक होण्याची शक्यता

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी बंडाचे निशाण हाती घेऊन उमेदवार उभे करण्याचे जाहीर केल्याने भाजपमध्ये फूट पडली आहे. या दुफळीचा फायदा कोणाला होईल, हे सांगणे अवघड आहे. गोटे यांचा स्वाभिमानी भाजप (लोकसंग्राम) आणि मूळ भाजपमध्ये चाललेल्या संघर्षांत ‘मिशन फिफ्टी प्लस’ गाठताना भाजपचा कस लागणार आहे. निवडणुकीत भाजपचे तीन मंत्री आणि स्वतंत्रपणे मैदानात उतरलेले आमदार गोटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भाजपने गुंड, गुन्हेगार, माफियांना उमेदवारी देऊ  नये, अशी भूमिका घेत गोटे महापालिका निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पक्षाने प्रतिस्पर्धी राजकीय पक्षातील मातब्बर नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना पक्षात मुक्त प्रवेश दिला. पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीतील बहुतांश नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झाले. त्यापैकी बहुतेकांबाबत गोटे यांचा आधीपासून आक्षेप आहे. राष्ट्रवादी विरुद्ध गोटे यांच्यातील पूर्वापार चाललेल्या संघर्षांत ज्यांच्याशी वाद होते, तीच मंडळी भाजपमध्ये आल्याने गोटे यांनी हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला. उघडपणे भाजपशी संघर्षांची भूमिका घेणाऱ्या गोटेंना पक्षाने निर्णयप्रक्रियेतून बाजूला सारण्यास सुरुवात केली. या निवडणुकीची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली. महाजन यांच्या मदतीला संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना दिले. त्यामुळे संतप्त गोटेंनी निष्ठावान भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या सोबतीने ‘स्वाभिमानी भाजप’ अशी स्वतंत्र चूल मांडली. निवडणुकीच्या तोंडावर ‘आमदार आपल्या दारी’ ही संकल्पना राबवून चौकाचौकांत सभा घेतल्या, प्रश्न समजावून घेतले; पण गोटे यांच्या या कृतीमागे केवळ निवडणूक हेच कारण असल्याचे लपून राहिलेले नाही.

गोटे यांची मोहीम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनावर घेतली नाही. हे लक्षात आल्यावर गोटे यांनी कोणत्या ना कोणत्या कारणांनी भाजप नेतृत्वाला लक्ष्य केले. गोटे ऐकत नसल्याने भाजपने पुढे पक्षीय कार्यक्रमात त्यांना बोलावण्याचे टाळले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित संकल्प मेळाव्याचे निमंत्रण नसतानाही व्यासपीठावर गेलेल्या गोटेंना भाषण करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे अपमानित गोटेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन महापौरपदाची निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी राजीनामा अस्त्र म्यान केले. स्थानिक नेते सक्षम असताना बाहेरील नेत्यांवर निवडणुकीची जबाबदारी देण्याची गरज काय, असा त्यांचा प्रश्न होता. गोटे इतरांसमवेत निवडणुकीची जबाबदारी सांभाळतील, असे सांगितले गेले; परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही.

गोटे यांच्या मागणीकडे पक्षाने दुर्लक्ष केले आणि निश्चित केलेल्या इच्छुकांनाच एबी अर्ज देत गोटे यांना शह देण्याची तयारी केली. या घडामोडींची परिणती धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये दुफळी निर्माण होण्यात झाली.

गोटे यांच्या आरोपांमुळे त्यांना पक्ष नारळ देईल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र भाजपने टोकाचा निर्णय घेण्याचे टाळले. नाशिक, जळगाव महापालिका निवडणुका पक्षाने गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत. धुळे महापालिकेची निवडणूक संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्यासाठी महत्त्वाची आहे. जिल्ह्य़ातील दुसरे मंत्री जयकुमार रावल यांच्यावरही गोटे यांनी आरोप केले असल्याने त्यांच्यावरही जबाबदारी आहे. गोटे यांच्यावरील कारवाईबाबत महापालिका निवडणुकीतील निकाल पाहून भाजप निर्णय घेण्याची चिन्हे आहेत.

गोटे यांना आता केवळ स्वपक्षाविरुद्धच नाही तर मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि इतरांशीही तोंड द्यावे लागणार आहे. आघाडीने भाजप आणि गोटे यांना रोखण्याची व्यूहरचना केली आहे. ही निवडणूक गोटे यांचे राजकीय भवितव्य ठरविणारी असेल. गोटे भाजपचे संख्याबळ कमी करू शकतात. त्यामुळेच भाजपचे ‘मिशन फिफ्टी प्लस’ यशस्वी करण्यासाठी निवडणूक प्रभारी गिरीश महाजन कोणते डावपेच आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपचे गणित

गोटे यांनी राजीनामा देण्याचे टाळून  भाजपलाच आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत त्यांनी याची कल्पना दिली होती. गोटे यांच्या पक्षाला विजय मिळाला तरी भाजपचाच विजय असेल आणि त्यांच्या पक्षाचा पराभव झाल्यास त्यांना धडा मिळेल, असे भाजपचे गणित आहे.