23 January 2021

News Flash

महाराष्ट्रात ‘इथे’ होतं राणीचं राज्य, नवी माहिती आली समोर!

उत्खननात पुरातत्त्व शास्त्रज्ञांना सापडली वाकाटक राणी प्रभावती गुप्त यांची एक मुद्रा

धवल कुलकर्णी

राजमाता जिजाऊसाहेब, झाशीची राणी, कित्तूरची राणी चन्नम्मा यांच्यासारख्या पराक्रमी राण्या आपल्याला ठाऊक आहेत. पण साधारणपणे दोन हजार वर्षांपूर्वी अशीच एक शूर आणि कर्तबगार महिला एका राज्याची प्रमुख होती.

ही कहाणी सुरू होते इसवी सन 385 च्या दरम्यान. सध्याच्या नागपूर जिल्ह्यातल्या रामटेकमध्ये, जे प्राचीन काळामध्ये वाकाटक साम्राज्याची राजधानी नंदिवर्धन म्हणून ओळखलं जात होतं. या राज्याची राणी होती कनौजचा राजा चंद्रगुप्त (दुसरा) विक्रमादित्य याची मुलगी प्रभावती गुप्त.

महाराष्ट्रातले पहिले एतद्देशीय राजे म्हणजे सातवाहन आणि त्यानंतर क्रम लागतो तो याच वाकाटकांचा. वाकाटकांचे राज्य हे इसवीसन 250 ते इसवी सन 550 दरम्यान होते. वाकाटक याने तत्कालीन राजांसोबत विवाह बंधनं जुळवली होती आणि कदाचित अशामुळेच राजा चंद्रगुप्त दुसरा याच्या या कर्तबगार कन्येसह रूद्रसेन (दुसऱ्या)चे लग्न लावण्यात आले असावे.

ही मुद्रा साधारणपणे सहा 6.4 ग्रामची आहे.

प्रभावतीचा नवरा रुद्रसेन (दुसरा) याच्या मृत्यूनंतर प्रभावतीने स्वतः साधारणपणे पंधरा वर्षे म्हणजे 385 ते 400 च्या दरम्यान राज्यकारभार सांभाळला. सुरुवातीला तिने आपला मोठा मुलगा दिवाकर सेन याला गादीवर बसून राज्य केलं पण त्याचा अकाली मृत्यू झाला. नंतर तिने आपला दुसरा मुलगा दामोदर याला राज्यपद दिलं, अशी माहिती पुरातत्व खात्याचे असिस्टंट डायरेक्टर विराग सोनटक्के यांनी दिली.

सर्वसाधारण धारणा अशी आहे की वाकाटकांच्या कालखंडामध्ये महाकवी कालिदासाने रामटेकला येऊन आपल्या अजरामर मेघदूताची रचना केली होती.

महाराष्ट्राच्या पुरातत्व विभागाने आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी नगरधनला (रामटेक पासून साधारणपणे पाच किलोमीटर) 2015-16 च्या दरम्यान उत्खनन केले होते. इसवीसन साडेतीनशेमध्ये वाकाटक राजा पृथ्वीसेनने आपली राजधानी पद्मापूरहून नंदिवर्धनला हलवली असे म्हणतात. हे नंदिवर्धन म्हणजेच आजचे नगरधन. या वाकाटकच्या राजधानीमध्ये केलेल्या उत्खननात या पुरातत्त्व शास्त्रज्ञांना वाकाटक राणी प्रभावती गुप्त यांची एक मुद्रा सापडली.

“प्रभावती गुप्तची मुद्रा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे,” अशी माहिती या उत्खनन टीममध्ये असलेले महाराष्ट्र राज्य पुरातत्व खात्याचे असिस्टंट डायरेक्टर विराग सोनटक्के यांनी दिली. सोनटक्के म्हणाले, या मातीच्या मुद्रेवरून हे लक्षात येतं की प्रभावतीने पती रुद्रसेन (दुसरा) याच्या निधनानंतर राज्यकारभार हाती घेतला होता. या मुद्रेवर तिचे “श्री प्रभावती गुप्त” हे नाव ब्राह्मी लिपीमध्ये लिहिण्यात आले असून, तिच्या् नावावर शंखाचे चिन्ह आहे.

ही मुद्रा साधारणपणे सहा 6.4 ग्रामची आहे आणि साधारणपणे 9.50 मिलिमीटर जाडीची असून त्याचे डायमेन्शन साधारणपणे 35.71 मिलिमीटर ते 24.20 मिलिमीटर आहे. त्याच्यावर असलेल्या शंखाच्या चिन्हावरून प्रभावतीचे धार्मिक समज आपल्याला कळतात. त्या कदाचित विष्णूचा भक्त असाव्यात.

तज्ञांच्या मते महाराजा प्रवरसेन (पहिला) याच्यानंतर वाकाटकांचे राज्याचे चार तुकडे पडले. या शहरांपैकी फक्त दोन तुकडेच इतिहासाला ठाऊक आहेत, ते म्हणजे मुख्य असलेली नंदिवर्धन-प्रवरपूर शाखा आणि दुसरी म्हणजे वत्सगुल्म शाखा आजच्या वाशिममधून राज्य करत होती.

रामटेक पासून साधारणपणे पाच किलोमीटर असलेले नगरधन म्हणजेच प्राचीन काळातले नंदिवर्धन याचा व्यापार कधीकाळी अफगाणिस्तान आणि इराक सोबत होता. शास्त्रीय पुराव्यानुसार नगरधन मध्ये iron age पासून म्हणजे इसवी सन पूर्व 1000 ते सहाशे वर्षांपासून ते मौर्य, पूर्व सातवाहन, सातवाहन, क्षत्रप, वाकाटक, गोंड, नागपूरकर भोसले ते सध्याच्या काळापर्यंत सातत्याने मानवी वस्ती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 11:18 am

Web Title: who was rani prabhavati gupta dhk 81
Next Stories
1 जयंती विशेष: स्वामी विवेकानंदांची ही वाक्यं देतील संघर्षात लढण्याची प्रेरणा
2 जयंती विशेष: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा ध्यानधारणा! विवेकानंदांचा संदेश
3 जयंती विशेष : काही काळासाठी स्वामी विवेकानंदही झाले होते बेरोजगार
Just Now!
X