रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील अंतिम आकडेवारीनुसार वाढलेल्या मतदानाचा लाभ कोणाला होईल, याबद्दल राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये झालेल्या सरासरी मतदानाची टक्केवारी सुमारे ६०-६२ टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज बुधवारी संध्याकाळी जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला होता. जिल्ह्याच्या दुर्गम भागातील मतदानाची आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे त्याबाबत अनिश्चितता होती. पण गुरुवारी सकाळी हाती आलेल्या अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण सरासरी ६४.३१ टक्के (७ लाख ९६ हजार ९५९) मतदानाची नोंद झाली आहे. त्यापैकी दापोली मतदारसंघात ६१.४४ टक्के (१ लाख ६१ हजार ६५०), गुहागरमध्ये ६६.५३ टक्के (१ लाख ५१ हजार ४८७), चिपळुणात ६६.८९ टक्के (१ लाख ६६ हजार ६२०) आणि रत्नागिरीत ६५.८४ टक्के (१ लाख ७४ हजार ६३६) मतदान झाल्याचे चित्र पुढे आले आहे. या चार मतदारसंघांच्या तुलनेत राजापूर मतदारसंघात मात्र सर्वात कमी, जेमतेम ६० टक्के (१ लाख ४२ हजार ५६६) मतदान नोंदले गेले आहे.  राजापुरात शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्या विरोधात भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे तेथे मतदारांमध्ये फारसा उत्साह नसावा, असा अंदाज आहे. त्याचबरोबर पाचही मतदारसंघांच्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागांपेक्षा मतदारांचा उत्साह जास्त होता.
यंदा सर्वच मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती असल्यामुळे निवडणूक निकालाबाबत अंदाज बांधणे कठीण झाले आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचीही विजयासाठी मतविभागणीवर भिस्त आहे. मतदान कमी झाल्यास त्याबाबत अंदाज येऊ शकतो. पण प्रत्येक मतदारसंघात ६० ते ६६ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्यामुळे त्यांची विभागणी कशी झाली असेल, हे सांगणे कठीण आहे. तरीसुद्धा एकूण जनमताचे वारे लक्षात घेता शिवसेनेला मागील निवडणुकीप्रमाणेच पाचपैकी तीन किंवा कदाचित चार जागाही मिळू शकतील आणि सेनेचे जिल्ह्यातील वर्चस्व कायम राहील, असा अंदाज आहे.