सात आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात

नागपूर : विदर्भातील सात सदस्यांचा विधान परिषदेवरील कार्यकाळ येत्या एप्रिल ते जुलै महिन्यात संपुष्टात येत असून त्यांच्या जागेवर या भागातून कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत.

सात आमदारांमध्ये पदवीधर मतदारसंघाचे (नागपूर विभाग) प्रतिनिधित्व करणारे भाजपचे अनिल सोले, शिक्षक मतदारसंघाचे (अमरावती विभाग) शिवसेना पुरस्कृत अपक्ष श्रीकांत देशपांडे यांचा कार्यकाळ जुलै २०२० पर्यंत आहे. विधानसभा सदस्यांमधून निवडून गेलेल्यांपैकी यवतमाळचे हरिसिंह राठोड आणि भाजपचे अरुण अडसड यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० पर्यंत, तर राज्यपालांकडून नामनियुक्त सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ख्वाजा बेग (यवतमाळ) आणि प्रकाश गजभिये (नागपूर), रिपाइंचे जोगेंद्र कवाडे (नागपूर) यांचा कार्यकाळ जून २०२० मध्ये संपुष्टात येणार आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अद्याप जाहीर झाली नाही. मात्र त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे अनिल सोले हे या जागेसाठी पुन्हा दावेदार आहेत. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अनेकदा प्रयत्न करूनही काँग्रेसला तो सर करता आला नाही. अनेक वर्षे येथून भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी निवडून गेले होते.

शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे श्रीकांत देशपांडे हे अपक्ष असले तरी शिवसेना पुरस्कृत आहेत. सध्या शिवसेनेच्या नेतृत्वात राज्यात सरकार असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

विधानसभा सदस्यांमधून निवडून गेलेल्यांपैकी काँग्रेसचे हरिसिंग राठोड यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेशी जवळीक साधली होती. भाजपचे अरुण अडसड यांची निवड पक्षाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर झाली होती. अडसड यांचे पुत्र आता धामनगावचे विधानसभा सदस्य आहेत. त्यामुळे यांच्याऐवजी भाजप नव्या चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.

राज्यपाल नामनियुक्त तीन सदस्यांपैकी प्रकाश गजभिये (राष्ट्रवादी) आणि प्रा. जोगेंद्र कवाडे (रिपाइं) हे दोघे नागपूरचे आहेत. मागच्या वेळी काँग्रेस-रिपाइं आघाडीतून कवाडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली होती. यावेळीही आघाडी त्यांच्या वाटय़ातील एक जागा कवाडे यांच्यासाठी सोडू शकते. विदर्भातील पक्षाचा दलित चेहरा म्हणून गतवेळी राष्ट्रवादीने प्रकाश गजभिये आणि मुस्लीम चेहरा म्हणून यवतमाळचे ख्वाजा बेग यांना संधी दिली होती. या वेळी पक्ष नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे.

निवृत्त होणारे सदस्य

’ प्रा. अनिल सोले (भाजप)       पदवीधर मतदारसंघ (नागपूर)     जुलै २०२०.

’ श्रीकांत देशपांडे (अपक्ष) शिक्षक मतदारसंघ (अमरावती)    जुलै २०२०.

’ हरिसिंग राठोड  (काँग्रेस)       वि. स. सदस्यांतून निवड एप्रिल २०२०

’ अरुण अडसड (भाजप)         वि. स. सदस्यांतून निवड एप्रिल २०२०

’ प्रकाश गजभिये (राष्ट्रवादी)      राज्यपाल नामनियुक्त    जून २०२०

’ जोगेंद्र कवाडे (रिपाई)   राज्यपाल नामनियुक्त    जून २०२०

’ ख्वाजा बेग (राष्ट्रवादी)  राज्यपाल नामनियुक्त    जून २०२०