आज प्रत्येकजण स्वत:चे हक्क जपण्यासाठी आग्रही दिसून येतो; परंतु नदी, पर्यावरणाच्या हक्काचे काय असा प्रश्न उपस्थित करतानाच ज्यांच्याकडून आपण जीवन घेतो, त्यांच्याच जीवनावर घाला घालतो, अशी खंत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केली. डॉ. राणा यांनी विष्णुपुरी प्रकल्प, थुगाव, गोवर्धनघाट येथे जाऊन गोदावरी पात्राची सकाळी पाहणी करताना पाण्याची अवस्था पाहून चिंता व्यक्त केली.
मॅगसेसे व स्टॉकहोम जलपुरस्काराने सन्मानित असलेले डॉ. राणा सकाळी नांदेडमध्ये दाखल झाले. येथे आयोजित शंकरराव चव्हाण व्याख्यानमालेचे ३६ वे पुष्प गुंफण्यासाठी ते आले होते. सायंकाळी ‘महाराष्ट्रासाठी नदी पुनरुज्जीवनाची आवश्यकता’ या विषयावर कुसुम सभागृहात त्यांचे व्याख्यान झाले. नदीपात्र शुद्धीकरणाचे कार्य हाती घेतलेल्या माँ गोदावरी श्रमसेवा अभियानच्या अरुंधती पुरंदरे, प्रवीण साले, पौर्णिमा श्रीवास्तव, प्रा. सचिन रातोळीकर यांच्यासमवेत तीन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गोदावरी नदीची त्यांनी पाहणी केली. विष्णुपुरी प्रकल्पाला भेट देऊन शहराची पाणीयोजना समजावून घेतली. महापालिकेचे उपायुक्त मुंडे व अभियंता झंवर यांनी माहिती दिली.
विष्णुपुरी प्रकल्प लाभक्षेत्रातील थुगाव येथे डॉ. राणा यांनी भेट दिली. येथील पाण्यात ‘बीओडी’ची (बायो ऑक्सिजन डिमांड) मात्रा ३० पीपीएमपर्यंत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. अशा पाण्यात आंघोळ करणेही योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पाण्यात ऑक्सिजनची मात्रा जास्त असेल तर जैवविविधता टिकते अन्यथा सूक्ष्मजीवांबरोबर मोठय़ा जिवांचेही जीवन धोक्यात येते. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हा ‘लाडका मुलगा’ असल्याचे मत व्यक्त करून येथील लोकांना नद्यांचे पावित्र्य जपता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. थुगाव येथे गोदावरीचे सौंदर्य पाहून ते हरखून गेले.
अन्य देशांच्या तुलनेत भारतातील नद्यांचे प्रदूषित पाणी फार कमी अंतराच्या प्रवासात शुद्ध होते. अमेरिकेत नद्यांतील पाण्याचे प्रदूषण ३०० किलोमीटर अंतराचा प्रवास केल्यानंतर शुद्ध होण्यास मदत होते. युरोपियन देशात २६५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, तर भारतात केवळ ४५ किलोमीटरच्या प्रवासात पाणी शुद्ध होण्याची प्रक्रिया होते. सूर्याची सरळ पडणारी किरणे, वाहत्या वाऱ्याचा वेग व येथील माती या गुणधर्माचा आपल्याला खूप फायदा आहे. पर्यावरण संतुलनात जगाचा गुरू होण्याची क्षमता आपल्यात असली, तरी यापासून आपण अनभिज्ञ आहोत. पाश्चात्त्यांच्या नकला करण्यात आपण धन्यता मानतो. त्यासाठी अहमहमिका लागल्याचे सांगून ‘स्मार्ट सिटी’चे उदाहरण त्यांनी दिले.
गोवर्धनघाट येथे नदीपात्रातील पाणी पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली. येथे प्लास्टिकसह इतर अनेक वस्तू नदीकिनारी पाण्यात पडल्याचे दिसून आले. येथील पाण्यात प्रत्येक आजाराचे मूळ असल्याचे ते म्हणाले. विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागातील पात्रातील पाणी व प्रकल्पाच्या पुढील पात्रातील पाणी यात प्रचंड फरक दिसून आले. येथे काठावर जाताच पाण्याची दरुगधी येते. जायकवाडी ते बाभळी या अंतरात ११ बंधारे बांधले असले, तरी पाण्याचा दर्जा पाहता त्याचा उपयोग शून्य असल्याचे त्यांचे मत होते. येथून बोंढार येथील मलशुद्धीकरण प्रकल्प व तेथून एलिचपूर दक्षिण नांदेडसाठीचा मलशुद्धीकरण प्रकल्प पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. येत्या आठ महिन्यांत शहरातील सर्व नाले वळवून मलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी आणले जाईल. जेणेकरून गोदावरी नदीत शहरातील सांडपाणी जाणार नाही, असा विश्वास महापालिका उपायुक्त मुंडे व अभियंता झंवर यांनी व्यक्त केला.