एकीकडे सरकार शेतकऱ्यांना त्रास देत आहे आणि दुसरीकडे पिकविमा कंपन्या धनाड्य होत आहेत, जिथं सोयाबीन पिक लावलेले आहे, तिथं या पिकविमा कंपन्या सोयाबीनचं पीकच विम्यातून वगळतात. कापूस लावला तर कापूस वगळतात. मात्र सरकार यावर काहीच बोलत नाही. पिकविमा कंपन्यांवर कोणाचा वरदहस्त आहे? असा सवाल करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे.

साडेतीन शक्तीपीठातील एक माहुर गडावरील रेणुका देवीचे दर्शन घेऊन आज शिवस्वराज्य यात्रेच्या तिसर्‍या दिवसाची सुरुवात करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात ( सारकणी किनवट ) येथे पारंपारिक वेशभुषेत, वाद्यांच्या तालमीत शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत करण्यात आले. तसेच दुचाकी रॅली देखील काढण्यात आली होती.
यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटले की, शेतकऱ्यांना असंख्य आश्वासने देण्यात आली. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर ते शेतकऱ्यांना विसरले. मुख्यमंत्री जरी माझ्या शेतकऱ्यांना विसरले असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीच विसरू शकत नाही. म्हणून आज आम्ही सरकारच्या फसव्या कर्जमाफीविरोधात आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मोदी है तो मुमकीन है असं म्हटले जात होतं. पण त्यांनी सगळा बट्ट्याबोळ केला, रोजगार नसल्याने तरुणांना कोण मुलगी देत नाही. आता विधानसभा निवडणुकीत हे म्हणतील फडणवीस है तो मुमकीन है, मात्र तुम्ही यांच्या शब्दांना बळी पडू नका. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी यावेळी केली.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, खासदार डॉ.अमोल कोल्हे, माहुरचे आमदार प्रदीप नाईक, आमदार ख्वाजा बेग, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख,ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, डॉ. शैलेश मोहिते आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.