मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. मी स्थितप्रज्ञ असून, प्रत्येक चौकशीला मी हसतखेळत सामोरे जातो. पण मोपलवार यांचे प्रकरणही उघडकीस आले होते. त्यावेळी कथित समाजसेवक गप्प का होते?, दरवेळी फक्त मलाच टार्गेट केले जाते?, असा प्रश्न भाजप नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. सुनील तटकरे आणि अजित पवारांविरोधातील याचिकेतून माघार का घेतली, असा प्रश्नही त्यांनी अंजली दमानियांना विचारला.

अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी एकनाथ खडसे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत दमानिया यांना प्रत्युत्तर दिले. नुसते आरोप करायची लोकांना सवय असते. सुनील तटकरे आणि अजित पवारांवरही गंभीर आरोप केले होते. मग या प्रकरणात माघार का घेतली, असा सवाल त्यांनी दमानिया यांना विचारला आहे. माझ्यावर यापूर्वीही असंख्य आरोप झाले. दाऊदशी संबंध असल्याचा आरोपही झाला. मात्र चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही. माझ्या एनआरआय जावयाने मोठी कार घेतली. त्यावरुन आरोप झाले. या प्रकरणाच्या चौकशीतूनही काहीच निष्पन्न झाले नाही, असे त्यांनी सांगितले. आमचे सरकार संवेदनशील असून, सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये यासाठी आरोपांची चौकशी होते. मी स्वत:देखील चौकशीला सामोरा जातो, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

भोसरीतील जमीन खरेदीवरुन माझ्यावर आरोप झाले. पण या जमिनीच्या सात बाऱ्यावर अजूनही मूळ मालकाचे नाव आहे. जमिनीचा ताबा माझ्या जावयाला मिळालेला नाही, असा दावाही त्यांनी केला. शेती हेच माझ्या उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी राज्यात मोपलवार यांचे प्रकरण उघडकीस आले. याशिवाय आणखी काही प्रकरणेही उघडकीस आली. पण या प्रकरणांवर कथित समाजसेवक गप्प का होते, फक्त मलाच टार्गेट का केले जाते असे त्यांनी म्हटले आहे.

वाचा: अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंवर केलेला हा आरोप