पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. आता भाजपाकडून असे सांगितले जाते आहे की काश्मीरमधील जवान शहीद झाले त्याचा बदला घ्यायचा असेल तर पुन्हा भाजपाला मतं द्या, कमळासमोरचे बटण दाबा, असा प्रचार सुरु करणं म्हणजे चाळीस जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखा प्रकार आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेने केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून या सगळ्या प्रकारावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. साडेचार वर्षात काश्मीरमध्ये गुलाबाचे ताटवे का कोमजले, आशेच्या गुलाबपाकळ्या का झडून पडल्या याचं उत्तर द्या असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?

कश्मीरातील हल्ल्यात 40 जवान शहीद झाले असतानाच पाकड्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणखी एका अधिकार्‍याचा बळी घेतला आहे.सैनिकास वीरगती प्राप्त व्हावी, पण ती प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढताना. इथे युद्धाची, अतिरेक्यांशी दोन हात करण्याची संधी न मिळताच जवानांच्या देहाच्या चिंधड्या झाल्या आहेत. त्यांच्या मृतदेहांची ओळख पटण्यापलीकडे आहे. अलीकडे आमचा तिरंगा अभिमानाने फडकवण्यात कमी व मृत जवानांच्या शवपेट्यांना गुंडाळण्यातच जादा खर्च होत आहे. कोणतेही युद्ध नाही, पण एकाच वेळी 40 जवान गतप्राण होतात. हे गेल्या साडेचार वर्षांत पहिल्यांदा झालेले नाही. उणीदुणी काढण्याची ही वेळ नाही. सरकार व जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची, त्यांचे आत्मबल वाढविण्याची ही वेळ आहे, पण ‘सरकार’ विसरले असले तरी देशाची जनता काही गोष्टी विसरत नसते.

कश्मीर खोर्‍यातील जे प्रमुख लोक हिंदुस्थानच्या बाजूने आहेत त्यांना देण्यात आलेली सुरक्षा सरकारने काढून घेतल्याचा आरोप डॉ. अब्दुल्ला करतात व सरकार त्यावर गप्प आहे. आता सरकारने कश्मीरातील ‘हुरियत’ नेत्यांची म्हणजे फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढून घेतली. हा झटका चांगला आहे. कश्मीरच्या निमित्ताने देशात ‘हिंदू-मुसलमान’, ‘हिंदुस्थान-पाकिस्तान’ असा वाद निर्माण करून धार्मिक फाळणीच्या नावावर राजकीय लाभ म्हणजे निवडणुकांचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका व्यक्त केली जात आहे, ती खरी ठरू नये. कश्मीरातील तरुण शिक्षण, रोजगार, प्रतिष्ठा यापासून ‘दूर’ जात आहे व तोच तरुण नाइलाजाने उपजीविका म्हणून स्वतःच्याच देशाविरुद्ध शस्त्र हाती घेत आहे. यावर काम करणे गरजेचे आहे. पाकिस्तान याचा फायदा घेत आला व घेत राहील. कश्मीरातील तरुणांना, मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाला अफझल गुरू, बुरहाण वाणीसारखे लोक स्वातंत्र्यसैनिक व जवळचे वाटतात, तितके आमचे पंतप्रधान मोदी का वाटत नाहीत? पंतप्रधान मोदी जेव्हा कश्मीरवासीयांना आपले वाटतील तेव्हा शांततेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे गेलेले असेल. कश्मीर प्रश्नाचे राजकारण देशात करायचे, पण कश्मीरात उद्ध्वस्त झालेल्या गुलाबावर पाय ठेवून पुढे जायचे हे आता तरी थांबावे. ‘‘कश्मीरातील जवानांच्या हत्येचा बदला घ्यायचा असेल तर पुन्हा भाजपला मते द्या, कमळासमोरचे बटण दाबा’’ असा प्रचार सुरू करणे म्हणजे 40 मृत जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे. साडेचार वर्षांत कश्मीरातील गुलाबाचे ताटवे का कोमेजले, आशेच्या गुलाबपाकळ्या का झडून पडल्या याचे उत्तर द्या!