विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपचे सरकार येणार असून, राज्यातील आघाडी शासनाने गेल्या १५ वर्षांत केलेल्या ११ लाख ८८ हजार कोटींच्या भ्रष्टाचारातील पै,पै ची चौकशी केली जाईल. जनतेच्या घामाचा पैसा लुटणाऱ्यांना सोडणार नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या तोंडावर क्लिअर केलेल्या फाईल्सचीही एसआयटी नेमून चौकशी केली जाईल, होऊन जाऊन द्या, दूध का दूध, पाणी का पाणी असे इशारे पे इशारे भाजपनेते विनोद तावडे यांनी दिले.  
कराड दक्षिणचे भाजप उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ मलकापूर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील, जगदीश जगताप, डॉ. सुरेश भोसले, मलकापूरच्या नगराध्यक्षा शारदाताई खिलारे, डॉ. अतुल भोसले, रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांची उपस्थिती होती. तावडेंच्या भाषणादरम्यान मुस्लिम बांधवांची अजान सुरू झाली असता, पाच मिनिटे थांबवून त्यांनी सर्वधर्मीयांच्या भावनांचा आदर करण्याची भाजपची शिकवण असल्याचे सांगितले.
तावडे पुढे म्हणाले, की पृथ्वीराजबाबांना आता आजोबा ठरवून नातवंडांना गोष्टी सांगण्यासाठी मोकळे करा. अतुलबाबांच्या तुलनेत पृथ्वीराजबाबांच्या सभांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कराड दक्षिणचा निकाल हा प्रतिसादच सांगून जात असून, अतुल भोसलेंना निवडून द्या, भाजप सरकारमध्ये त्यांना सन्मानाचे पद देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातील ११ कोटी ८० लाखांवर जनता पृथ्वीराज चव्हाणांचे पार्सल दिल्लीला पाठविणार आहे. चव्हाणांनी विकासकामांसंदर्भात लावलेल्या फ्लेक्सच्या खर्चाइतका तरी निधी मतदारसंघाला दिला आहे का? असा सवाल करून, डॉ. अतुल भोसलेंना निवडून द्या. प्रलंबित अन् मूलभूत गरजांसंदर्भातील सर्व कामे तत्काळ मार्गी लावू असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या टेबलवर फाईल होती त्यावर सही केली असती तर अजितदादांची जयललिता झाली असती. असे म्हणणारे पृथ्वीराज चव्हाण स्वत:ला स्वच्छ कसे म्हणवतात. तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालता, मग स्वच्छ कसे? स्वच्छ प्रतिमेचा कांगावा करणाऱ्या चव्हाणांनी आचारसंहितेपूर्वीच्या पंधरा दिवसात फाईलींवर सह्या करून, मोठय़ा प्रमाणात कामाना मंजुरी दिली आहे. त्यात हितसंबंध जपण्यासाठी काही प्रकरणे मंजूर झाल्याची शक्यता असल्याने आम्ही सत्तेवर आल्यास या सर्व फाईलींची एसआयटी (विशेष शोध पथक ) नेमून चौकशी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आघाडी सरकारने आपल्या १५ वर्षांच्या कारभारात ३ लाख कोटींचे म्हणजेच दरडोई २७ हजार रुपयांचा कर्जाचा डोंगर करून ठेवला असल्याचे नमूद केले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, की लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठीही जनतेने मोदींच्या भाजपवर विश्वास ठेवावा. केंद्रातील मोदी सरकारने शंभर दिवसात काय केले. असा सवाल केला जातो. मग, पेट्रोल, गॅसचे दर कोणी कमी केले? टीकाकारांनी शेतकऱ्यांच्या ऊसदर आंदोलनासंदर्भात काय भूमिका घेतली. त्यासाठी वेळ दिला का? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना मतदारसंघातील गावांची नावे, तिथल्या समस्या माहीत आहेत का? अशा प्रश्नांचा भडीमार करताना,  विद्यमान आमदारांना अखेरच्या क्षणापर्यंत खुर्ची सोडायचीच नाही, अशी जळजळीत टीका त्यांनी केली.  कराड दक्षिण काँग्रेसचा बालेकिल्ला वगैरे नाही. यशवंतराव मोहितेंनी अन्य पक्षातून येथे प्रतिनिधित्व केले आहे. आता, मोदींच्या पाठीशी राहण्याची जनतेची ठाम भूमिका असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
अशोकराव गायकवाड यांनीही आघाडी शासन व पृथ्वीराज चव्हाणांवर चांगलाच हल्लाबोल केला. काँग्रेसने छत्रपतींचा महाराष्ट्र उद्ध्वस्त केला आहे. दलितांचे शोषण केले आहे. त्यांना जनता हकलणार असून, परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास त्यांनी दिला. कराड दक्षिणेत १, ८०० कोटींची कामे झाली असती तर जनतेने तुम्हाला घरात बसवून भरघोस मताने निवडून दिले असते, असा टोला त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना लगावला.