विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सरकारी रुग्णालयात दाखल झाले. यावरुन सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत पाठ थोपटून घेत आहे. मग करोनाची लागण झालेल्या १६ मंत्र्यांपैकी एकाही मंत्र्याने ही हिंमत का दाखवली नाही असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. देवेंद्र फडवीस यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर ते सरकारी रुग्णालयात दाखल होतील. त्यांची करोना चाचणी दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले. आता यावरुन भाजपाने सत्ताधारी पक्षांना प्रश्न विचारला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करोनाची बाधा झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की, मला जर करोना झाला तर मुंबईच्या सरकारी रुग्णालयातच दाखल करा. सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करा असं फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना सांगितलं होतं. या दोघांच्या संवादाची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती.  दरम्यान देवेंद्र फडणवीस हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बघा किती चांगली यंत्रणा आहे असं म्हणत सत्ताधारी नेते आपली पाठ थोपटून घेऊ लागले. ज्यानंतर आता भाजपाने तुमच्या १६ मंत्र्यांना करोना झाला त्यांच्यापैकी एकानेही फडणवीसांप्रमाणे सरकारी रुग्णालयात दाखल होण्याची हिंमत का दाखवली नाही असा प्रश्न विचारला आहे.

आणखी वाचा- अजित पवार करोना पॉझिटिव्ह; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

आत्तापर्यंत अशोक चव्हाण, बच्चू कडू, धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड, हसन मुश्रीफ, नितीन राऊत यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधल्या १६ मंत्र्यांना करोनाची बाधा झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.