भाजपा खासदार नारायण राणे यांनी आज(शनिवार) पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. काल(शुक्रवार) स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी होती. यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हॅण्डलरवरून सावरकरांना अभिवादन करण्यात न आल्याने राणेंनी निशाणा साधला आहे. “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी” असं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे.

“काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त सीएमओ महाराष्ट्र आणि मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरुन अभिवादन व्यक्त करण्यात आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी.” अशा शब्दांमध्ये ट्विट करून नारायण राणेंनी टीका केली आहे.

शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही; उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत – राणे

या पूर्वीही नारायण राणेंनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरादार टीका केलेली आहे. “शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही, गद्दारी करून ते सत्तेत गेले आहेत. उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत. तडजोड करणारे, पदासाठी हवं ते करणारे आहेत. त्यामुळे हिंदुत्व विचार व शिवसेना हे समीकरण नाही.” असं नारायण राणेंनी म्हटलेलं आहे.