स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातच शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाबाबत अनेकांना अनेक गोष्टी सांगितल्या. मात्र ते हे हेतुपुरस्सर हे विसरले की हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्यांच्या नावे असणाऱ्या सभागृहात दसरा मेळावा घेतला. मग याच वीर सावरकरांवर जेव्हा काँग्रेस नेते टीका करत होते तेव्हा शिवसेना गप्प का होती? सत्तेच्या सिंहासनासाठी हे मौन शिवसेनेने धरलं आहे का? असा प्रश्न भाजपा नेते राम कदम यांनी विचारला आहे.

रविवारी झालेल्या दसरा मेळाव्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक मुद्द्यांवर टीका करत आपल्या खास ठाकरी शैलीत भाष्य केलं. कंगना प्रकरणावरुनही त्यांनी टोला लगावला. हिंदुत्व म्हणजे काय हे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचा उल्लेख करत पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. भाजपाचे नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना काँग्रेसवर टीका का केली नाहीत? असा प्रश्न विचारला आहे.

आणखी वाचा- काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्व समजून घ्यावं; मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरी या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर दोन लेख प्रकाशित करण्यात आले. यापैकी एका लेखात वीर सावरकर यांचा उल्लेख बलात्कारी आणि दुसऱ्या लेखात त्यांचा उल्लेख माफीवीर असा करण्यात आला. त्यामुळे या पुस्तकावर तातडीने बंदी घालावी आणि काँग्रेसने या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली होती. एवढंच नाही तर सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली आहे का असाही प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता.