कधी वेतनवाढीसाठी आंदोलने होतात, विविध मागण्‍यांसाठी आंदोलने होतात मात्र हे आंदोलन वैशिष्‍टयपूर्ण असून सर्वधर्मीयांचा सहभाग असलेले हे आंदोलन आहे. राज्‍यात दारूची दुकाने, मॉल्‍स सुरू करण्‍यात आली आहेत. त्‍याठिकाणी करोनाची भीती नाही. मग केवळ प्रार्थना स्‍थळांमध्‍ये करोनाची भीती या सरकारला वाटत असल्याचे म्हणत देशात सर्वत्र प्रार्थनास्थळे सुरू असताना महाराष्ट्रातच बंद का? असा सवाल राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुगंटीवार यांनी महाविकासआघाडी सरकारला उद्देशून केला. भाजपातर्फे चंद्रपूर शहरात आयोजित घंटानाद आंदोलनात आमदार सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

यावेळी मुनगंटीवार म्हणाले,  देशात केवळ महाराष्‍ट्रातच प्रार्थनास्‍थळे बंद आहेत. गेली सहा महिने मुख्‍यमंत्र्यांनी जे जे आवाहन केले ते आम्‍ही नियम पाळून मान्‍य केले, त्‍यावर अमल केला. मात्र आता नियम पाळून प्रार्थनास्‍थळे उघडा अशी मागणी आम्‍ही करीत आहोत. जहा दवा काम नहीं करती वहा दुआ काम करती है… असे म्‍हणतात. अशावेळी नागरिकांना आपल्‍या श्रध्‍दास्‍थानासमोर भक्‍तीने लीन होण्‍यासाठी राज्‍यातील सर्व प्रार्थनास्‍थळे उघडण्‍यात यावी अशी मागणी  मुनगंटीवार यांनी केली.

आणखी वाचा- “जो उत्साह दारूची दुकाने उघडताना दाखवला त्यातला अर्धा उत्साह तरी…”; फडणवीसांची सरकारवर टीका

भाजपातर्फे आज मंदीर, मशीद, चर्च, गुरूद्वारा, बुध्‍दविहार, जैन मंदीर आदी प्रार्थनास्‍थळे उघडण्‍यात यावी या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्‍यात आले.

राज्‍यात दारूची दुकाने, मास विक्री, मॉल्‍स, बसेस, व्‍यापार सर्व सुरू असताना केवळ प्रार्थनास्‍थळे बंद असणे ही बाब निश्‍चीतच सर्वधर्मीय नागरिकांना न रूचणारी आहे. माहिती व जनसंपर्क विभागाला सांगून सर्व प्रार्थनास्‍थळांसमोर सावधानीचे उपाय सांगणारी नियमावली शासनाने प्रसिध्‍द करावी व सर्वधर्मीयांना त्‍यांच्‍या आराध्‍यांचे दर्शन घ्‍यायची मुभा द्यावी. देशात सर्वदूर प्रार्थनास्‍थळे उघडी असताना महाराष्‍ट्रातच प्रार्थनास्‍थळे बंद का? हा प्रश्‍न अनाकलनीय आहे, असेही  मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

आणखी वाचा- “मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद”… म्हणत कोल्हापुरात घंटानाद आंदोलन

मुस्‍लीम, ख्रिश्‍चन, शीख, बुध्‍द व हिंदू धर्माच्‍या सर्व प्रमुख आंदोलनात सहभागी झाल्‍याबद्दल त्‍यांनी आभार व्‍यक्‍त केले. यावेळी ”दार उघड उध्‍दवा, दार उघड..” असे नारे देत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी घंटानाद केला. सर्व धर्माच्‍या प्रमुखांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करत राज्‍य सरकारवर जोरदार टिका केली. कार्यक्रमाचे संचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले. आभार डॉ. मंगेश गुलवाडे यांनी व्‍यक्‍त केले. यावेळी सोशल डिस्‍टन्‍सिंग पाळत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने मागणीचे निवेदन जिल्‍हाधिकारी यांना सादर केले.