करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे. तसेच बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्याचंही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेलं आहे. एकीकडे केंद्र सरकारने ही भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे मात्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील दहवीच्या परीक्षा होणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असूनही शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

CBSE Exam : दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

“केंद्र सरकारने करोनाची परिस्थिती पाहता सीबीएससीच्या परीक्षा रद्द केल्या. राज्यातील मेडिकलच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मग दहावीच्या परिक्षांबाबत अजूनही गोंधळ माजवून का ठेवला आहे? वर्षा गायकवाड विद्यार्थ्यांच्या जीवाशी का खेळत आहात?” असा सवाल भाजपाकडून करण्यात आलेला आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा लांबणीवर

दरम्यान राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. “राज्य सरकार सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही. सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या तरी राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करणार नाही,” असं वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे.

राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार; वर्षा गायकवाड यांची महत्वाची माहिती

नुकतंच राज्य सरकारने महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातल्या करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भातला निर्णय जाहीर करण्यात आला होता. ११ एप्रिल रोजी होणाऱ्या MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. या आधारावर प्रशासकीय अधिकारी, पालक वर्ग आणि शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं होतं.