रायगड जिल्ह्य़ातील उल्हास नदीच्या खोऱ्यात मुबलक पाणी उचलण्याऐवजी कोयनेचे पाणी चिपळूणहून मुंबईला नेणे हे व्यवहार्य नाही. त्यापेक्षा कमी खर्चाचे पर्याय उपलब्ध असताना कोयनेचे पाणी मुंबईला नेण्याचा अट्टहास का केला जात आहे, असा सवाल आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी उपस्थित केला आहे. येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

चिपळूण नगरपालिकेतर्फे डॉ. चितळे यांचा गुरुवारी नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना चितळे यांनी कोयनेचे पाणी मुंबईला नेण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर टीका केली. ते पुढे म्हणाले की, कोयनेचे अवजल चिपळूण येथून दूरवर मुंबईला नेणे परवडणारे नाही. शिवाय या पाण्याची मुंबईकरांना कितपत गरज आहे, याचाही विचार होणे गरजेचे आहे. खरोखरच आवश्यकता असेल तर त्यापेक्षाही कमी खर्चीक पर्याय उपलब्ध आहेत. असे असताना हा अट्टहास का केला जात आहे, असा प्रश्न निर्माण होतो.

कोयनेचे अवजल चिपळूण येथून दूरवर मुंबईला नेणे परवडणारे नाही. शिवाय या पाण्याची मुंबईकरांना कितपत गरज आहे, याचाही विचार होणे गरजेचे आहे. या खर्चीक पर्यायापेक्षा इतर पर्यायांचा विचार व्हावा.
-डॉ. माधवराव चितळे