मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते त्या दहा वर्षात १७१ जवान शहीद झाले, तर मोदींच्या कार्यकाळात ७०० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. तरीही यांची भाषणं सुरु आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. नांदेडमध्ये झालेल्या संयुक्त सभेत भुजबळ बोलत होते. आज तर मी असं ऐकलं की एक यज्ञ यात्रा निघाली आहे. देशात एक यज्ञ केला जाणार आहे जेणेकरून देशावर कुणीही हल्ला करू नये. असं यज्ञ करून कधी हल्ले रोखता येतात का? असाही प्रश्न भुजबळांनी विचारला. इतकंच नाही तर एक कविताही भुजबळ यांनी वाचली.

भुजबळ म्हटले, ना जियो का डाटा चाहिये, ना पतंजलीका आटा चाहिये..ना जनधन बँक ना खाता चाहिये.. ना अंबानी, अदानी टाटा चाहिये..पाकिस्तानमें इंदिराजीके समयका सन्नाटा चाहिये असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. नुसत्या पूजा आणि यज्ञांनी काम होणार नाही. पाकिस्तानला गप्प करायचं असेल तर खरी छप्पन इंची छाती असलेली माणसं हवीत. या देशात काय चाललं आहे? १९६५ मध्ये लाल बहाद्दूर शास्त्रींनी पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. त्यावेळी त्यांनी नारा दिला होता जय जवान-जय किसान. जवानाचा जयजयकार झाला पाहिजे तसाच आपल्या शेतकऱ्याचाही झाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती. मात्र सध्या शेतकरी आत्महत्या करत आहेत. गोमांसाच्या संशयावरून माणसं मारली जात आहेत असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. यासाठी त्यांनी अखलाख आणि पोलीस निरीक्षक सुबोध कुमार यांचंही उदाहरण दिलं. देशात वातावरण चांगलं नाही. तुम्ही खरं बोललात, जाब विचारला की तुम्हाला तुरुंगात डांबलं जातं. मला दोन वर्षे तुरुंगात का डांबलं होतं याचं कारण मला माहित नाहीच. शिवाय मला ज्यांनी अटक केली त्यांनाही हे कारण माहित नाही असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

मोदींच्या कार्यकाळात मीडियावरही बंधनं लादली जात आहेत. पत्रकारांना स्वातंत्र्य राहिलेलं नाही. मोदींच्या विरोधात काही बातमी चालवली की त्यांची नोकरी जाते, यासाठी भुजबळ यांनी पुण्यप्रसून वाजपेयी यांचंही उदाहरण दिलं. आता या सगळ्या टीकेला भाजपाकडून कसं उत्तर दिलं जाणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.