आमदारांनी पोलिसांवर हात उचलला हे चुकीचेच आहे. त्याबद्दल अजिबात माफी नाही. मात्र, पोलिसांवर हात उचलल्यानंतरही राज्यातील सत्ताधारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस राजकारण करत आहे. पाच आमदारांना निलंबित केल्यानंतर गुन्हे फक्त दोनच आमदारांवर का, बाकीच्या तिघांवर अद्याप गुन्हे का नाहीत, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी अमरावती येथील जाहीर सभेत उपस्थित केला. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱयाच्या तिसऱया टप्प्याचा शेवट अमरावती येथील जाहीर सभेने झाला. त्यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी विधानभवनाच्या परिसरात पोलिस अधिकाऱयाला झालेल्या मारहाणीचा मुद्दा उपस्थित केला.
ते म्हणाले, पोलिसांवर हात उचलायचा नाही, हे अगदी स्पष्ट आहे. उद्या न्यायाधीशांना माराल. व्यवस्था नावाची गोष्ट आहे की नाही. इथपर्यंत घडलेल्या घटना समजू शकतो. मात्र, आमदारांच्या निलंबनानंतर घडलेला प्रकार अनाकलनीय आहे. पाच आमदार निलंबित झाले. मात्र, पोलिसांनी गुन्हे केवळ दोनच आमदारांवर दाखल केले. बाकीच्या तिघांवर गुन्हे का दाखल केले गेले नाहीत. त्यांच्यावर गुन्हे नाही, तर त्यांना निलंबित का केले. माझ्या माहितीप्रमाणे, पोलिस अधिकाऱयाला मारहाण करणाऱयांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचेही आमदार होते. मग स्वतःच्या पक्षाच्या आमदारांचे निलंबन का केले नाही. आम्हाला निलंबित केले, तर अर्थसंकल्पाला विरोध करू. केवळ अर्थसंकल्पाला सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विरोध करू नये, म्हणून त्यांना निलंबित केले नाही. या सगळ्या प्रकरणाची विधानभवनातील सीसीटीव्हीची चित्रफीत दाखविली जात नाही. आता माझ्या माहितीप्रमाणे शिवसेना, भाजपच्या आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा घाट घातला जातोय.
भोळ्याबाबड्या जनतेने यांचे राजकारण पाहात राहायचे का, असा प्रश्न विचारून राज ठाकरे यांनी ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर आणि ‘आयबीएन लोकमत’चे संपादक निखिल वागळे यांच्यावर विधीमंडळात आणलेल्या हक्कभंगावर टीका केली. या दोन्ही संपादकांची भूमिका समजावून न घेता, हक्कभंग कसा काय आणता. लोकप्रतिनिधी हे लोकांच्या जीवावर निवडून गेलेले असतात. लोकांच्या हक्कांचे यांना काही नाही. मात्र, त्यांचे हक्क महत्त्वाचे असाही प्रहार राज ठाकरे यांनी केला.