केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार हे उत्तम काम करत आहे. विविध कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या आहेत. आपल्या देशाची वाटचाल ही त्यामुळे समृद्ध आणि विकसित राष्ट्राच्या दिशेने सुरु आहे. त्याचमुळे भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे असं प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

कामगार नेते बळवंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील माथाडी कामगार संघटना, मुंबई मासे विक्रेते संघटना आणि जिल्हा कोळी महिला संघाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी भाजप विधिमंडळ पक्षाचे प्रतोद आ. राज पुरोहित, आ. रमेश पाटील, प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ आणि प्रदेश कोषाध्यक्ष शायना एनसी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे नेते बळवंतराव पवार, दादासाहेब मोरे, प्रकाश पाटील, अरुण संख्ये, संदीप पवार, ज्ञानेश्वर मुसळे, हनीफ अन्सारी, विलास पाटील, रमेश सिंग, प्रदीप साळुंके, राजाराम पाटील, अबुभाई पटेल यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई जिल्हा कोळी महिला संघाच्या अध्यक्ष छाया ठाणेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपा मध्ये प्रवेश केला.

माथाडी कामगार तसेच कोळी बांधव भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभे राहतील असा विश्वास बळवंतराव पवार यांनी यावेळी व्यक्त केला.