गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी भाजपला का करावी वाटली नाही, असा प्रश्न शिवसेना प्रवक्ते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांनी आता आरपारची लढाई लढली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या रूपात उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेता संपवला, अशी टीकाही त्यांनी केली.

पाटील यांनी सोमवारी दुपारी येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. गोपीनाथ मुंडेंसारख्या मोठय़ा नेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी भाजपला वाटले नाही, असे पाटील यांनी सांगितले.

खडसे आणि फडणवीस यांच्यातील युद्ध असेच चालते. पुन्हा बंद पडते. खडसे यांच्या रूपाने फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला आहे. आता खडसेंनी पूर्ण युद्ध लढायला हवे. खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्त्व राहणार नाही. युद्ध आणि कुस्ती कधीही अपूर्ण खेळायची नसते, असा चिमटा पाटील यांनी काढला.