प्रकाश आंबेडकरांचा सवाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंगाल झालेले राष्ट्र जर सरकारला काबूत करता येत नसेल तर सरकारने राजीनामा द्यावा. कंगाल पाकिस्तानपुढे शरणागती का पत्करता, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे  नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

येथे वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा शनिवारी पार पडली. यावेळी आंबेडकर यांनी मोदी सरकार तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांवरही जोरदार हल्ला चढवला. आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत असा टेंभा मिरविणाऱ्यांनी आपले वेगळेपण काय आहे ते तरी सांगावे. कंगाल पाकिस्तानशी आरपार लढाई करायची असेल तर त्याला जिगर लागते. फुसके, लुळे, पांगळे लोक ही आरपारची लढाई लढू शकत नाहीत, अशी टीकाही यावेळी अांबेडकर यांनी केली. ‘सीआरपीएफ’च्या जवानांना शहिदांचा दर्जा देणार की नाही, असा प्रश्न उपस्थित करून देश शोकात बुडालेला असताना पंतप्रधान मात्र आपल्या कारभाराच्या फीत कापत सरकारची उपलब्धी काय ते सांगत फिरत आहेत. सत्ताकेंद्रित राजकारणाने सुरुवातीला आपल्या जातीपुरती सत्ता मर्यादित करून ठेवली. त्यानंतर ही सत्ता आपल्या कुटुंबाची कशी राहील हे पाहिले. महाराष्ट्रात नात्यागोत्यातले राजकारण एकवटले असून १६९ कुटुंबे महाराष्ट्रावर राज्य करत आहेत, असा आरोपही  आंबेडकर यांनी केला. यावेळी त्यांनी मराठवाडय़ातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर केले.

असे आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार

औरंगाबाद-बी.जी.कोळसे पाटील (निवृत्त न्यायमूर्ती)

बीड- प्रा. विष्णू जाधव

नांदेड- प्रा. यशपाल भिंगे

उस्मानाबाद- अर्जुन सलगर

जालना- डॉ. शरदचंद्र वानखेड

अन्यथा फजिती होईल

काँग्रेस आम्हाला चार जागा देणारे कोण? आम्ही दिलेल्या चार जागा तुम्ही घ्या अन्यथा फजिती करून घ्याल. आम्ही तुमचे सालगडी म्हणून राहणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. राजकीय पक्षांचा आधार जात-धर्म होता कामा नये असा आग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धरला होता, हेही यावेळी त्यांनी भाषणात निदर्शनास आणून दिले. मराठवाडय़ातील पाच जागांची उमेदवारी प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली. तसेच परभणी आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार येत्या २३ फेब्रुवारीला जाहीर केले जातील असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why the surrender of a poorer pakistan
First published on: 17-02-2019 at 02:03 IST