सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथे रात्री आपल्या घरासमोर झोपलेल्या एका विधवा महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला. हा खून कोणी व कशासाठी केला, याचा उलगडा लगेचच झाला नाही. सांगोला पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.
आशाबाई शरद खांडेकर (३२) असे खून झालेल्या दुर्दैवी विधवा महिलेचे नाव आहे. तिचा पती शरद खांडेकर याने आठ महिन्यांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. पतीच्या पश्चात आशाबाई ही चार मुला-मुलींसह संसाराचा गाडा हाकत होती. रात्री जेवण उरकल्यानंतर आशाबाई ही मुला-मुलींसह घरासमोर अंगणात झोपली होती. मध्यरात्री मोठा मुलगा नीलेश हा चुलत्याबरोबर शेतात विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेला होता. दरम्यान, तुषार हा दुसरा मुलगा लघुशंकेसाठी झोपेतून उठला असता त्याने आईला जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु ती निपचित होती. तिच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव होत होता. शेजारी रक्ताने माखलेला दगड पडला होता. तेव्हा घाबरलेल्या मुलांनी जवळच राहणारी आजी सुशीला खांडेकर यांना हा प्रकार सांगितला. आशाबाईचा खून कोणी व कशासाठी केला, याचे गूढ उकलण्याचा प्रयत्न सांगोला पोलीस करीत आहेत.