नगर : पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून न्यायालयाने पत्नी व मेहुण्याला पाच वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. दीपाली मारुती शिंदे व तिचा भाऊ श्रीकांत अविनाश ससाणे (दोघेही रा. ससाणेनगर, श्रीगोंदे) या दोघांनी शिक्षा ठोठावण्यात आली. सदोष मनुष्यवधाच्या आरोपावरून ही शिक्षा देण्यात आली. तर या खटल्याच्या सुनावणी दरम्यान तिसरा आरोपी व दीपालीचा दुसरा भाऊ शशिकांत ससाणे याचे निधन झाले.

जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता विष्णुदास भोर्डे व गोरक्षनाथ मुसळे यांनी काम पाहिले. त्यांना सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी हवालदार थोरात यांनी सहाय केले. खटल्यात एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. आपसातील भांडणामुळे मारुती कैलास शिंदे व दीपाली हे दोघे विभक्त राहत होते. दीपाली श्रीगोंद्यात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काम करते. दि. २२ डिसेंबर २०१६ रोजी मारुती शिंदे हा दीपालीच्या शाळेत गेला. तेथे दोघांत वाद झाले. त्यानंतर दीपालीने तिचे दोन भाऊ श्रीकांत व शशिकांत या दोघांना बोलावून घेतले.

दीपाली, श्रीकांत व शशिकांत या तिघांनी मारुतीला शाळेतून ओढत बालाजीनगर भागातील काटवनात नेले व तेथे लाकडी दांडक्याने मारहाण केली. जखमी मारुतीला नातेवाइकांनी नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्याचे तीन दिवसांनी, दि. २५ डिसेंबरला निधन झाले. दीपक ससाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांनी केला.