कौटुंबिक कलहातून पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीने पतीची चाकूने भोसकून हत्या केली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. शैलेंद्र राजपूत असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर पूजा शैलेंद्र राजपूत असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. मारेकरी पत्नीला म्हणजेच पूजाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र आणि पूजा यांचा प्रेमविवाह झाला होता. या दोघांनाही वैष्णवी (वय 16) आणि सान्वी (वय-6) अशा दोन मुली आहेत. मात्र या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. या घटनेच्या काही दिवस आधी पूजाने शैलेंद्रच्या आईविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. कुटुंबात राहणे शैलेंद्रच्या पत्नीला म्हणजेच पूजाला आवडत नव्हते. काही महिन्यांपूर्वी हे दोघेही पैठण रोडवर असलेला बंगला सोडून खिवसरा पार्क या ठिकाणी असलेल्या एका घरात भाडे तत्त्वावर राहण्यासाठी गेले होते. मंगळवारी रात्री शैलेंद्र राजपूत त्यांचे काम संपवून घरी आले. त्यावेळी पूजा आणि शैलेंद्र या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद सुरु झाला.

तसेच पूजाने शैलेंद्रवर चारित्र्याचा संशयही घेतला. यावेळी वाद झाल्याने आणि रागाच्या भरात असल्याने पूजाने कोणताही विचार न करता स्वयंपाक घरातील चाकूने शैलेंद्रच्या मांडीच्या वरच्या भागात वार केला. मांडीतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राहुल खाडे, जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शैलेंद्र राजपूत यांना पोलिसांनी घाटी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पूजा राजपूतला ताब्यात घेण्यात आले असून तिची चौकशी सुरु आहे.