झोपेच्या गोळ्या देऊनही पतीचा मृत्यू न झाल्याने अखेर महिलेने फिनाइलचं इंजेक्शन देऊन पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रिया नाईक असं या महिलेचं नाव असून पती गोपी नाईक ठाणे महापालिकेत कामाला होते. प्रियाने गोपीची हत्या करण्यासाठी आधी झोपेच्या 35 गोळ्या दिल्या होत्या. पण त्यानंतरही गोपीचा मृत्यू न झाल्याने अखेर प्रियाने फिनाइलचं इंजेक्शन देऊन गोपीची हत्या केली.

28 डिसेंबर रोजी ही हत्या करण्यात आली. गोपी आणि प्रिया आपल्या सात वर्षांच्या मुलीसोबत ठाणे महापालिकेच्या क्वार्टरमध्ये राहत होते. गोपी आणि प्रियाचं नऊ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पण दोन वर्षांपूर्वी प्रियाच्या आयुष्यात अजून एक व्यक्ती आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी प्रियाची फेसबुकवर महेश नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. तेव्हापासून प्रियाचे विवाहबाह्य संबंध सुरु होते. काही दिवसांनी गोपीला याची माहिती मिळाली.

प्रियाला एका नातेवाईकाने महेशसोबत मॉलमध्ये फिरताना पाहिलं होतं. त्यांनी गोपीला याची माहिती दिली. यानंतर गोपीने विचारणा केली असता प्रियाने असं काहीच नसल्याचं सांगितलं. गोपीचा मात्र प्रियाच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. शेवटी गोपीने प्रियावर काही बंधनं टाकली. यानंतर प्रियाने गोपीच्या हत्येचा कट रचण्यास सुरुवात केली. महेश रेल्वेचा कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गोपीला पोलिओ आहे. याचाच फायदा घेत प्रिया आणि महेशने जेवणात झोपेच्या गोळ्या मिळवत हत्या करण्याचा कट आखला. कोणी विचारलं तर गोपीने आजाराला कंटाळून आत्महत्या केली असं सांगायचं. ठरल्याप्रमाणे महेशने प्रियाला झोपेच्या गोळ्या दिल्या. दुसऱ्या दिवशी प्रियाने गोपीच्या जेवणात 15 झोपेच्या गोळ्या मिसळल्या. यामुळे गोपी बेशुद्ध झाला आणि बेडवर झोपी गेला’.

‘गोपी बेशुद्ध झाला असता त्याचा मृत्यू झाला आहे असं प्रियाला वाटलं आणि तिने महेशला बोलावून घेतलं. पण काही वेळाने गोपीला शुद्ध आली. प्रियाने रात्री पुन्हा एकदा गोपीला ज्यूस आणि दुधात झोपेच्या 10-10 गोळ्या मिसळून दिल्या. यानंतर महेश आला आणि त्याने फिनाइलने भरलेलं इंजेक्शन गोपीला दिलं. गोपीने बचाव करण्याचा प्रयत्न केला पण बेशुद्ध असल्याने तो स्वत:ला वाचवू शकला नाही. यावेळी महेशने गोपीच्या डोक्यावर रॉडने वार केले’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोपीचा मृत्यू झाल्यानंतर महेश आणि प्रिया मृतदेह घेऊन रुग्णालयात जातात. गोपीचा अपघात झाला असून आम्हाला रस्त्याशेजारी मृतदेह सापडला असा दावा त्यांनी केला. रुग्णालयाने लवकराच लवकर मृतदेह सोपवावा आणि आपण त्याची विल्हेवाट लावू असा दोघांचा प्रयत्न होता. पण रुग्णालयाने पोलिसांना कळवलं. ज्यानंतर दोघांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी चौकशी केली असता दोघांची ओळख पटली. 1 जानेवारीला दोघांना माथेरानमधून अटक करण्यात आली.