12 December 2019

News Flash

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून

पतीचा खून करणारी पत्नी ही सोलापूर महापालिकेत स्वच्छता कामगार आहे.

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा

सोलापूर : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विजापूर नाका झोपडपट्टीत हा प्रकार घडला. पतीचा खून करणारी पत्नी ही सोलापूर महापालिकेत स्वच्छता कामगार आहे. तिचा प्रियकर हा रिक्षाचालक आहे.

संदीप बाबुराव शिंदे (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या गुन्ह्य़ात त्याची पत्नी स्नेहांकिता ऊर्फ स्नेहा (वय २६) व तिचा प्रियकर जावेद (पूर्ण नाव माहीत नाही.) या दोघांची नावे आरोपी म्हणून समोर आली आहेत. मृत संदीप याची आई कुसुम शिंदे हिने दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप शिंदे याचा विवाह स्नेहा हिच्याबरोबर झाला होता. त्यांना दोन अपत्येही झाली. तीन वर्षांपूर्वी स्नेहा हिला सोलापूर महापालिकेत स्वच्छता कामगार म्हणून नोकरी लागली. नोकरीसाठी दररोज हजेरी देण्याच्या ठिकाणी काळी मशीद दवाखान्याजवळ स्नेहा हिने भाडय़ाने घर घेतले. तेथून रस्ते स्वच्छ करण्यासाठी भवानी पेठेत ती जायची. त्यासाठी तिने जावेद नावाच्या तरुणाची रिक्षा भाडय़ाने ठरविली होती.

दररोज रिक्षातून येताना-जाताना जावेदबरोबर तिची चांगलीच ओळख झाली आणि त्याचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले. पुढे तिने स्वत:चा संसार सोडून जावेदबरोबर बाळीवेशीजवळ जम्माचाळीत राहू लागली.

दरम्यान, स्नेहा ही आपली नणंद वंदना हिला भेटली आणि आपण विजापूर नाका येथे सासरी नांदण्यास तयार आहे. आपली चूक झाली म्हणून तिने क्षमायाचनाही केली. त्यानंतर सासू कुसुम हिने सून स्नेहा व मुलगा संदीप यांना विजापूर नाका झोपडपट्टीत भाडय़ाचे घर मिळवून दिले. भाडय़ाच्या घरात राहत असताना स्नेहा हिचा आपला प्रियकर जावेद याजबरोबर पुन्हा संपर्क आला. पत्नी स्नेहा हिच्याकडे जावेदचे येणे पती संदीप यास पसंत पडत नव्हते. त्यातून त्यांच्यात भांडणे होत असत. आपल्या अनैतिक संबंधात पती संदीप हा अडथळा ठरतो म्हणून स्नेहा हिने प्रियकर जावेदच्या मदतीने काटा काढण्याचे ठरविले. या दोघांनी घरात संदीप यास काठीने बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी  झाला असता त्याला छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना अखेर त्याचा मृत्यू झाला.

First Published on June 20, 2019 3:34 am

Web Title: wife kills husband with the help of boyfriend
Just Now!
X