श्रीरामपूर : पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या वाटापूर (ता. नेवासे) येथील किशोर मुरलीधर बाचकर याला नेवासे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी जन्मठेपेची शिक्षा तर मयत महिलेचा छळ करणाऱ्या सासू, सासऱ्यांनाही न्यायालयाने दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, वाटापूर (ता.नेवासे) येथील जयश्री किशोर बाचकर हिचा मुलबाळ होत नाही म्हणून तसेच पैशासाठी छळ करण्यात येत होता. तसेच २५ ऑगस्ट २०१७ रोजी जयश्री हिचा पती किशोर बाचकर याने गळा आवळून खून केला. मयत जयश्रीचे वडील दादाभाऊ  लिंबाजी थोरात (रा. ढवळपुरी, ता. पारनेर) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी पती किशोर याच्याविरुद्ध खुनाचा तर अन्य आरोपींविरुद्ध छळ, हुंडाबळी, मारहाण आदि कलमान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

नेवासे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. न्यायाधीश बेलकर यांनी आरोपी किशोर बाचकर यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर सासरा मुरलीधर सबाजी बाचकर व सासू तान्हाबाळी मुरलीधर बाचकर यांना प्रत्येकी दोन वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते, मयूरेश नवले, पैरवी अधिकारी सुभाष हजारे, मुस्तफा शेख, सुहास बटुळे, गणेश चव्हाण आदिंनी काम पाहिले.