कोपरगांव : पत्नी नांदत नसल्याचा राग येऊन आरोपीने ती  शेतात काम करीत असताना दारु पिऊन तिचा खून केल्याच्या प्रकरणी कोपरगांव येथील सत्र न्यायालयात चालू असलेल्या खटल्यात साक्षीदारांचे महत्त्वपूर्ण जबाब व प्रत्यक्षदर्शी पुराव्यानुसार न्यायाधीश आर बी भागवत यांनी कैलास रेवजी पवार या आरोपीस १५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सदर घटना राहाता तालुक्यातील हसनापूर शिवारात १७ सप्टेंबर २०१५ रोजी घडली होती.

या संबंधी माहिती अशी की, आरोपी कैलास रेवजी पवार व शोभा कैलास पवार या पतीपत्नींचे आपसात पटत नव्हते.  कैलास दररोज दारु पिऊन शोभास मारहाण करून त्रास देत असे त्यामुळे ती कैलासकडे नांदत नव्हती याचा राग कैलासच्या मनात होता. १७/९/२०१५ रोजी सकाळी ११ चे सुमारांस हसनापूर ता.राहाता शिवारात नंदू राठी यांच्या शेतावर शोभा मजुरीने खुरपणीसाठी गेली होती त्यावेळी आरोपी हा सदर शेतात गेला त्यावेळी तो दारु पिलेला होता. त्याठिकाणी शेतमालकांदेखत आरोपीने शोभास शिवीगाळ केली व ओढून घरी घेऊन जात असतांना शेतालगतच्या रस्त्यावर आरोपीने खिशातून चाकू काढून तिच्या अंगावर सपासप वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व तेथून पळून गेला. शोभा गंभीर जखमी झाली तीस प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यानंतर पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालय नगर व तेथून पुणे येथे पाठवण्यास सांगितले परंतु तिची आर्थिक परिस्थिती नसल्याने ती जाऊ शकली नाही व पुढील उपचारही घेऊ शकली नाही. मारहाणीत झालेल्या जखमांमुळे तिला उठता बसता येत नव्हते. त्यात तिचा दि २/११/२०१६ रोजी मृत्यू झाला या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक बी व्ही शिंदे, सहा.फौजदार  आर के दिघे  यांनी भा द वि कलम ३०२ प्रमाणे तपास करुन आरोपी कैलासविरुद्ध गुन्हा दाखल झाला. नंतर सदर खटला राहाता न्यालयातून कोपरगांव येथील सत्र न्यायालयात वर्ग झाला.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले.  त्यात  फिर्यादी, घटना बघणाऱ्या साक्षीदार महिला,  शेतमालक नंदू राठी, पंच, वैद्यकीय अहवाल, डॉक्टरांचा जबाब, सदर घटनेत वापरलेल्या चाकूचा पंचनामा तपासण्यात आला  आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आल्यामुळे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश—२ आर बी भागवत  यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता अशोक वहाडणे यांनी भक्कम बाजू मांडली. न्यायालयाने साक्षीदारांचे जबाब, मिळालेला पुरावा व युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी कैलास रेवजी पवार यांस १५ वर्षांची सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.