07 July 2020

News Flash

Lockdown : पतीच्या अंत्यसंस्कारांनाही पोहचू शकली नाही पत्नी

लॉकडाउनमुळे पत्नीवर तेलंगणमध्येच अडकून पडण्याची वेळ आली

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

करोनाचा  प्रादुर्भाव होवू नये म्हणून करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे तेलंगणात अडकून पडलेल्या मिरची तोड मजुराची पत्नी पतीच्या अंत्यदर्शनासाठीही पोहचू शकली नाही. पतीच्या अंत्यसंस्कारासाठी पत्नीच पोहचू न शकल्याची दु:खद घटना चंद्रपुरातील सावली तालुक्यातील खेडी या गावी घडली आहे.

पती-पत्नीचे नाते हे सात जन्माचे आहे असे मानले जाते. पती असो की पत्नी कितीही दूर असले तरी आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मात्र वाट पाहिल्याशिवाय अंत्यसंस्कार होत नाहीत. मात्र सध्या देशात करोनाच्या प्रभावामुळे संचारबंदी व टाळेबंदीचा फटका अनेकांना बसतो आहे. त्यामुळे मजूर असलेली पत्नी सात जन्माचा साथीदार असलेल्या पतीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकली नाही.

मूळचे मूल तालुक्यातील बोरचांदली येथील रुपेश रामटेके यांचा विवाह १२ वर्षांपूर्वी खेडी येथील कविता भडके हिचेशी झाला. परंतु पतीचे आरोग्य साथ देत नसल्याने तो नेहमी आजारी असायचा. त्यामुळे संसाराचा गाडा चालविण्याचा भार कवितावर होता. मोल-मजुरी करून आपल्या १० वर्षाच्या मुलासह कधी बोरचांदली तर कधी खेडी येथे मजुरी करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करत होती. मिरची तोडण्याच्या कामासाठी तेलंगण या राज्यात आपल्या पतीला व मुलाला खेडी येथे ठेऊन ही माऊली गेली. मात्र जगात करोनाचे संकट आले. देशात, राज्यातच नाही तर जिल्हा, तालुका व गाव पातळीवरही संचारबंदी लागू झाली. त्यामुळे या कुटुंबालाही पटका बसला.

या सगळ्यात कविताचा पती रुपेश याची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे पत्नीच्या नातेवाईकांनी सावली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिक खालावत असल्याने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तिकडे पत्नीला कळवले मात्र टाळेबंदीमुळे येणे शक्य नव्हते.  डोळ्यातल्या अश्रूंशिवाय काहीच तिच्याकडे पर्याय उरला नाही. नातेवाईकांनी जीवनसाथी अर्धांगिनी शिवाय अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली. शेवटी पतीवर अंतिम संस्कार करण्यात आले. करोनाच्या टाळेबंदीमुळे एका पत्नीला पतीचे शेवटचे दर्शन सुध्दा घेता आले नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 7:53 pm

Web Title: wife not able to come for husbands funeral due to corona and lock down scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल
2 Coronavirus : मेयोतील करोनाची तपासणी करणाऱ्या पीसीआर यंत्रात बिघाड
3 लॉकडाउनमुळे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठकडून ऑनलाइन शिक्षण
Just Now!
X