करोनाग्रस्त मयत रुग्णाच्या अती संपर्कातील घोषित पत्नीचा चार दिवस उलटूनही घशातील स्त्रावाचा नमुना न घेता रूग्णालयातून घरी पाठविल्याने त्यांना उन्हात धुळे ते शिरपूर अशी ७० किलोमीटरची पायपीट करावी लागली. येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून झालेल्या गलथानपणामुळे महिलेची ससेहोलपट झाल्याचा वेदनादायी प्रकार घडल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील ४८ वर्षांच्या पुरुषाला २२ मे रोजी करोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. यामुळे त्या व्यक्तीच्या संपर्कातील २० लोकांना अती संपर्कातील म्हणून घोषित करण्यात आले. त्यात त्या करोनाग्रस्त व्यक्तीच्या पत्नीचाही समावेश आहे. पतीसोबत ४३ वर्षांची महिला हिरे महाविद्यालयात गेली होती.

यावेळी शिरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ध्रुवराज वाघ यांनी करोनाग्रस्त व्यक्तीसोबत आलेल्या महिलेचाही नमुना घ्यावा, असे पत्र दिले होते. यानंतर करोनाग्रस्त व्यक्तीला धुळे येथील हिरे महाविद्यालयात कोविड कक्षात उपचारासाठी दाखल केले. परंतु, त्यांच्या पत्नीला दाखल करण्यात आले नाही.

सोमवारी ४८ वर्षांच्या करोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीवर धुळे शहरातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर चार दिवस उलटूनही मृत व्यक्तीच्या पत्नीचे नमुने घेण्यात आले नाही. हिरे महाविद्यालयातून तिला घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला.

मंगळवारी सकाळी निघालेली ही महिला दिवसभर उपाशीपोटी पायपीट करीत सायंकाळी शिरपूर-चोपडा रस्त्यावरील सूतगिरणीजवळ पोहचली. हा प्रकार महिलेच्या नातवाईकांना कळताच त्यांचा संताप झाला. भाटपूरचे सरपंच शैलेश चौधरी यांनी ही माहिती शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांना दिली.

महाजन यांच्यासह तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रसन्न कुळकर्णी, थाळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे हे सूतगिरणीजवळ पोहोचले. त्यांनी महिलेसह नातेवाईकांची समजूत घालून तिला शिरपूरमधील कोविड कक्षात दाखल केले. तिचे नमुने चाचणीसाठी धुळ्यात पाठविण्यात आले आहेत.

महिलेला चार दिवस थांबवूनही तिचे नमुने न घेणाऱ्या धुळ्यातील डॉक्टरांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी भाटपुरा येथील नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेची जिल्हाधिकारी संजय यादव यांनी गांभीर्याने दखल घेत शिरपूरचे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविला आहे.