सांगली परिसरात पडलेला दुष्काळ, प्रशासनाचा ढिसाळ कारभार विरोधी पक्षाच्या आमदारांना मिळणारी चुकीची वागणूक या सगळ्यांमुळे आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील सांगली जिल्हा प्रशासनावर चांगल्याच चिडल्या. गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी सांगलीत घेतलेल्या बैठकीला सुमनताई अनुपस्थित राहिल्या. त्यांच्या अनुपस्थितीची सांगलीत चांगलीच चर्चा सुरु आहे. याबद्दल जेव्हा सुमनताईंना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी त्यांची नाराजी तीव्र शब्दांमध्ये व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी सांगलीत येऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. त्याबद्दल सुमनताई पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला साधं निमंत्रणही जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलं नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून विरोधी पक्षाच्या आमदारांना सापत्न वागणूक मिळते आहे. दुष्काळाच्या व्यथा प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांना काय कळणार असाही प्रश्नही सुमनताई पाटील यांनी विचारला आहे.

सांगलीचे हेच जिल्हाधिकारी माझ्या तासगांव तालुक्यात टँकर देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तालुक्यात माझ्या अंजनी गावांसह इतर दोन गावांमध्ये आम्ही राष्ट्रवादी पक्षामार्फत टँकर सुरु केलेले आहेत, असे अधिकारी दुष्काळाशी काय सामना करणार आहेत, असा हल्ला सुमनताईंनी चढवला आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगलीत येऊन दुष्काळाचा आढावा घ्यावा लागतो आहे. यावरूनच प्रशासनाचे काम किती जलदगतीने सुरु आहे हेच दिसून येते आहे असेही त्यांनी म्हटले आहे.