अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा मित्रास सुपारी देऊन पतीनेच खून केल्याचा प्रकार घडला. मात्र, दरोडेखोरांच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पतीच्या पोलिसांनी अवघ्या आठ तासांत मुसक्या आवळल्या. येनोली तांडा येथे मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.
केहाळ तांडा येथील विलास चतुरा चव्हाणचा विवाह गावातीलच सुनीता शंकर राठोड हिच्याशी १० वर्षांपूर्वी झाला. त्यांना ३ अपत्ये झाली. चव्हाणची केहाळ तांडा येथे सासऱ्याकडून मिळालेली ५ एकर जमीन आहे. त्यावर त्याचा उदरनिर्वाह चालत होता. नेहमीच जुगार-मटक्यात बुडालेल्या चव्हाणचे बोरखडी येथील महिलेशी सूत जुळले. तिच्याशी त्याला लग्न करायचे होते. परंतु पत्नी अडसर ठरत होती. एक महिन्यापूर्वी पत्नी सुनीताच्या जेवणात विष टाकून मारण्याचाही प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच सुनीताने तिचे जिंतूरचे काका लक्ष्मण राठोड व वडिलांच्या कानावर हा प्रकार घातला. पहिला प्रयत्न फसल्यानंतर चव्हाणने केहाळच्या चार मित्रांना एकत्र करून पत्नीला मारण्यास ४० हजार रुपयांची सुपारी दिली.
ठरल्याप्रमाणे मंगळवारी चव्हाण हा पत्नी सुनीता व मोठी मुलगी शीतल (वय १०) या दोघींना घेऊन बाजारासाठी जिंतूरला आला. बाजार आटोपून सायंकाळी जिंतूरला लक्ष्मण राठोड यांच्याकडे ते गेले. तेथे जेवण आटोपून संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोटारसायकलने केहाळ तांडय़ाकडे निघाले. मात्र, गावाकडे सरळ मार्गाने न जाता आडमार्गाने येनोली तांडामाग्रे निघाले. या रस्त्यावर चव्हाणचे ४ मित्र आधीच दबा धरून बसले होते. त्यांनी अचानक मोटारसायकल अडवून सुनीतास मारहाण सुरू केली. त्या वेळी चव्हाण मुलीला घेऊन येनोली तांडय़ावर आला व पत्नीस दरोडेखोर मारहाण करीत असून आपल्या हातातील दोन सोन्याच्या अंगठय़ा व मोबाईल चोरटय़ांनी काढून घेतल्याची बतावणी गावकऱ्यांसमोर केली. या वेळी गावातील १००-१५०जणांचा जमाव घटनास्थळाकडे आला. तोपर्यंत आरोपींनी सुनीताच्या डोक्यात दगड घालून ठार मारले व पोबारा केला. माहिती मिळताच जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे, निरीक्षक कैलास ओहळ यांनी येनोली तांडा येथे धाव घेतली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात येताच मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास परभणीहून श्वानपथक मागविले. श्वानाने मृत महिलेचा पती चव्हाण याच्याकडे दिशानिर्देश करताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. खाक्या दाखवताच हा खून आपणच केल्याचे त्याने कबूल केले व घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी खुनाच्या गुन्हयातील लक्ष्मण नाराण धोत्रे, श्रावण लोकडूजी धोत्रे यास अटक केली. उर्वरित दोघे फरार आहेत.