ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशात येत्या रविवारी, २५ मे रोजी पाणवठय़ांवर वन्यप्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. चोवीस तासांच्या या गणना कार्यक्रमात १५० पानवठय़ांच्या शेजारी १५० मचाणांवर स्वयंसेवी संस्था व वन खात्याचे एकूण ३०० प्रगणक सहभागी होणार आहेत.
पट्टेदार वाघाच्या अस्तित्वाने प्रसिद्धीस आलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेला हा कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले आहे. त्या दृष्टीने ताडोबा कोअर व बफर झोनचे अधिकारी कामाला लागले आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांच्या  उपस्थितीत मंगळवारी बैठक झाली. सलग चोवीस तास होणाऱ्या या प्राणीगणनेचा संपूर्ण आराखडा या वेळी तयार करण्यात आला.
ताडोबा प्रकल्पातील दीडशे पानवठय़ांवर ही गणना केली जाणार असून, १५० मचाणांवर स्वयंसेवी संस्थांचे १५० स्वयंसेवक तसेच वन खात्याचे १५० कर्मचारी सहभागी होणार आहेत. या गणनेत सहभागी होण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने स्वयंसेवकांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, तीनशेच्यावर स्वयंसेवकांनी प्राणीगणनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर केले. त्यातून १५० स्वयंसेवकांची निवड करण्यात आलेली आहे. ही गणना २५ मे रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सकाळी आठ वाजताच ताडोबा कार्यालयात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एका मचाणावर एक स्वयंसेवक व वन खात्याच्या एका कर्मचाऱ्याला ठेवण्यात येणार आहे. पाणवठय़ावर चोवीस तासांत आलेल्या प्रत्येक प्राण्याची नोंद घेतली जाणार आहे. आजवरचा अनुभव लक्षात घेता स्वयंसेवक प्राणीगणनेला येताना दारू, सिगारेट तसेच नॉनव्हेज जेवण, प्लास्टिक पिशवी घेऊन येतात. मात्र, या वेळी गणनेत सहभागी होण्यापूर्वीच स्वयंसेवकांची तपासणी केली जाणार आहे.
वनखात्याच्या निर्देशानंतरच स्वयंसेवकाला मचाणाच्या खाली उतरता येणार आहे. चोवीस तासांनी म्हणजे २६ मे रोजी सकाळी दहा वाजता प्राणीगणना संपणार आहे. गणना संपताच प्रत्येक मचाणाच्या जवळ वन खात्याची जिप्सी स्वयंसेवकाला घेण्यासाठी जाणार आहे. त्या जिप्सीत बसूनच स्वयंसेवकाला परत यायचे आहे. ही गणना यशस्वी व्हावी यासाठी ताडोबाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी, बफर झोनचे उपवनसंरक्षक कल्याणकुमार ताडोबा कोअरचे उपवनसंरक्षक सुजय दोडल परिश्रम घेत आहेत.