पारा नवे उच्चांक गाठण्याच्या बेतात असताना वन्यप्राण्यांच्या जीवाची काहिली थांबविण्यासाठी जंगलक्षेत्रात कृत्रिम वनबंधारे बांधण्याचे उपक्रम स्वयंसेवी संस्था आणि वन खात्याने सुरू केले आहेत. मेळघाटचा संपूर्ण प्रदेश यंदा भीषण उन्हाळ्याने तीव्र पाणी टंचाईचा सामना करीत असल्याने सातपुडा फाऊंडेशनच्या साह्य़ाने मेळघाट व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने वनबंधाऱ्यांच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला असून तंत्रज्ञान आणि उपलब्ध नैसर्गिक जलस्रोतांचा वापर करून पाण्याची साठवण करण्याचे प्रयोग यशस्वी केले आहेत. मेळघाटातील गुगामल, सिपना आणि आकोट वन विभागात विद्यार्थी आणि गावक ऱ्यांच्या श्रमदानातून बंधाऱ्यांनी कडक उन्हाळ्यातही वन्यप्राण्यांसाठी पाण्याचा नवा स्रोत उपलब्ध झाला आहे.
काही बंधाऱ्यांवर सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले असून त्यामुळे प्राण्यांना २४ तास पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. सातपुडा फाऊंडेशनने  गावक ऱ्यांच्या साह्य़ाने विविध व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील गावांनजीक बांधलेल्या शंभरावर बंधाऱ्यांनी जंगलातील पाण्याची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने देशभरातील राज्य सरकारांना अनोखी दिशा दाखविली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या जंगलक्षेत्रातील अनेक गावांमध्ये हा उपक्रम यशस्वी यशस्वीपणे राबविला जात आहे. चंद्रपूर-अंधारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात डझनावारी बंधाऱ्यांवर वन्यजीवांची तहान भागत आहे. कान्हा, पेंच (कर्माझरी) आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावांनी यासाठी योगदान दिले आहे. त्यापासून स्फूर्ती घेऊन मेळघाटातील राक्षा, तारुबंदा आणि चौराकुंड या गावांनी बंधारे बांधले. आता पाटकहू या छोटय़ाशा गावानजीकच्या जंगलक्षेत्रातही बंधारा बांधल्याने अतिदुर्गम आणि मागास म्हणून शिक्का बसलेले मेळघाटचे आदिवासी वन विभागाच्या प्रगत नकाशावर आले आहेत. कडक उन्हाळ्यातही हा बंधारा पाण्याने तुडूंब भरला असून शेकडो वन्यजीव येऊ लागले आहेत.
पाटकहू गावानजीक असलेल्या नैसर्गिक पाण्याचा स्रोत बाराही महिने पाणी देत असतो. परंतु, आजूबाजूला गाळ साठल्याने पाणी वाहणे बंद होते. गावकऱ्यांनी स्रोताच्या आजूबाजूला खोल खड्डा करून त्याचे कृत्रिम वनबंधाऱ्यात रुपांतर केले. बफर क्षेत्रातील गावांना विश्वासात घेऊन निसर्ग संरक्षण संस्थेने मेळघाटात साकारलेला हा प्रयोग देशभरातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प तसेच अभयारण्यांसाठी आदर्श ठरेल अशाच पद्धतीचा आहे. भीषण जलसंकटाच्या काळात उद्भवणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षांवरील हमखास रामबाण उतारा म्हणून या प्रयोगाकडे पाहिले जात आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडू लागले असून नद्या, ओढे, नाले ओढे आटण्याच्या मार्गावर आहेत. संपूर्ण मे महिना आणि जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत  ही स्थिती कायम राहणार असून वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुरेशी खबरदारी घेण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत. मात्र, प्रत्येक बीटमध्ये पाणी उपलब्ध करून देणे वन खात्याला शक्य नाही. वन खात्याला मदत करण्यासाठी सातपुडा फाऊंडेशनने २००९ साली हा उपक्रम हाती घेतला. यात दुर्गम भागातील शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि गावक ऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले. जंगलप्रदेशातून वाहणारे ओढे, नाल्यांचे प्रवाह वळवून या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठविले जात आहे.
पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना १५ टक्के जलसाठा वन्यप्राण्यांसाठी राखून ठेवण्याची सक्ती करावी आणिलहान ओढय़ांवरील कृषी पंपाद्वारे होणारे सिंचन बंद करावे, अशी मागणी सातपुडा फाऊंडेशनने राज्य वन्यजीव मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती. यावर राज्य सरकारने गंभीरपणे विचार सुरू केला असून तशा सूचना संबंधित खात्याला देण्यात आल्याचे समजते.  
पाटबंधारे व सिंचन विभागाला नवीन अध्यादेश अंमलात आणण्यासाठी ३० जुलै १९९० च्या अध्यादेशात दुरुस्ती करणे भाग आहे. सद्यस्थितीत राज्यभरातील जंगलांमधील पाणवठे कोरडे पडण्याच्या बेतात असल्याने छोटय़ा ओढय़ांवरच वन्यजीवांना तहान भागवावी लागणार आहे. ओढय़ांमध्ये लघुत्तम सिंचन पातळी शिल्लक असून मित्रकीटक आणि छोटय़ा वन्यजीवांसाठी असे बंधारे उपयुक्त ठरणार आहेत.