राखी चव्हाण/ मोहन अटाळकर/ प्रशांत देशमुख

शेतकऱ्यांचे अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. थोडीफार आश्वासक स्थिती निर्माण झालेली असतानाच अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्य़ातील शेतकऱ्याला आता वाघाच्या दहशतीत जगावे लागत आहे. मात्र, सणासुदीच्या तोंडावर घरातील कमावती माणसे गमावलेल्या शेतकऱ्याकडे ना प्रशासनाचे लक्ष्य आहे, ना वन्यजीवप्रेमींचे. वाघाला पकडण्यासाठी कोटय़वधी रुपयाचा खर्च होत असताना शेतकरी आणि गावकरी दुर्लक्षित ठरले आहेत, तर दुसरीकडे वन्यजीवप्रेमींनासुद्धा वाघांची चिंता आहे, पण गावकऱ्यांकडे ते ढुंकूनही पाहायला तयार नाही.

पांढरकवडय़ातील टी-वन वाघिणीच्या दहशतीमुळे महिनाभरापासून शेतकरी घरातच बसले आहे. शेतातील उभे पीक डोळ्यांनी दिसत असतानाही त्याला कापणी करता येत नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याची उपजीविका वाघाच्या दहशतीत सापडल्याने सणासुदीचा थोडाफार आनंददेखील त्याला लुटता येत नाही. ही स्थिती अशीच कायम राहिली तर पीके वाळून जातील आणि पुन्हा एकदा आत्महत्येच्या यादीत एक कारण जुळेल. पांढरकवडय़ात सध्या हीच स्थिती आहे. या परिसरातील गावकरी वाघाच्या दशहतीत जगत आहे. त्यांना घराच्या बाहेर पाऊल टाकताना हजार वेळा विचार करावा लागत आहे.

तेरा गावकऱ्यांचा बळी

पांढरकवडय़ाच्या आजूबाजूला एक-दोन नाही तर गेल्या दोन वर्षांत तेरा गावकऱ्यांचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला. वनखात्याने डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ मध्ये वाघाला जेरबंद करण्यासाठी मोहीम राबवली. मात्र, असमन्वयाचा अभाव या मोहिमेत नडला. आताही एक महिना लोटून गेला आहे, पण येथेही पुन्हा तीच चुक वनखात्याला नडत आहे. या सर्वामध्ये पीडित गावकरी मात्र दुर्लक्षीत झाला आहे. या धक्क्यातून सावरण्याआधीच वर्धा, अमरावती येथेही वाघाने दहशत पसरवली आहे. या जिल्ह्य़ातील गावांमध्येही वाघाच्या दहशतीने गावकऱ्यांना जगणे कठीण केले आहे. पुलगाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात जाणे सोडले आणि रात्रभर ते जागरण करत आहे.

हिंगणघाटमध्येही दोन दिवस शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. वडनेरलगत घटवईच्या महाविद्यालय परिसरातही वाघ दिसल्याची चर्चा असल्याने तेथेही महाविद्यालय बंद ठेवण्यात आली. पुलगावच्या शेतातही वाघाने शिरकाव केला होता. वर्धा जिल्ह्य़ात वाघाने माणसावर हल्ला केल्याची एकही उदाहरण नाही, पण दोन जनावरे फस्त केली. त्यामुळे दहशतीतील गावकऱ्यांनी शेतात जाणे सोडले. वध्रेच्या चारही बाजूने तब्बल १५ दिवस वाघाने ठाण मांडले होते. वाघाचा मुक्काम असणाऱ्या ठिकाणी ना जंगल होते, ना झुडपी जंगल तरीही त्याचा वावर मात्र होता. अमरावतीत मात्र वाघाने धुडगूस घातला. शेतात सोयाबीन आणि इतर पिकांचा कापणीचा हंगाम असताना दोन माणसांचा बळी या वाघाने घेतला. वाघाची दहशतीत वर्धा नदीच्या काठवरील सुमारे ३० गावे जगत आहेत. त्यातील २२ गावांना वनखात्याकडून खबरदारी बाळगण्याचा आदेश देण्यात आला आहे.

१५ दिवस या परिसरातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे ते वेगळेच. वनखात्याने मनुष्यबळ आणि आर्थिकबळ वाघाच्या जेरबंदीच्या मोहिमेसाठी लावले आहे. हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त आवश्यक आहेच, पण त्यामुळे संकटात सापडलेल्या गावकऱ्यांचाही विचार होणे आवश्यक आहे. मात्र, एकूणच या मोहिमेत गावकरी पूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे.

* १९ ऑक्टोबरला रात्री मंगरुळ दस्तगीर येथे वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार.

* २२ ऑक्टोबरला रात्री अंजनसिंगी येथे वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार.

* पांढरकवडय़ात वाघिणीच्या हल्ल्यात १३ जणांचा बळी

विद्यार्थ्यांना धोका

धामणगाव रेल्वे तालुक्यात वाघाचा वावर असण्याची शक्यता असल्याने तसेच वाघ मुख्य मार्गावरून फिरत असल्याने मौजा अंजनसिंगी, अंजनवती, ढाकूलगाव, गव्हनिपाणी, अशोकनगर, पिंपळखुटा या गावातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाघापासून धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी जंगलाचा मार्ग ओलांडावा लागतो. त्यामुळे अमरावतीच्या जिल्हादंडाधिकाऱ्यांनी संबंधित गावातील शाळांना सुटी देण्याबाबत त्यांच्या कार्यक्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४(३) अंतर्गत योग्य आदेश निर्गमित करण्याची सूचना दिली. या पद्धतीने आता प्रशासकीय यंत्रणेला आदेश काढावे लागत आहेत.