News Flash

गणपतीसाठी कोकणात जाता येणार का?; आढावा बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

नवीन प्रशासकीय इमारत येथे बैठक घेण्यात आली

फाइल फोटो

यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावरही करोनाचेच सावट असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाता येणार की नाही हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचसंदर्भात आज पालकमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षते खाली बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये परब यांनी चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी जाण्याची परवानगी असल्याची माहिती दिली आहे. कोकणातील करोना पस्थितीचा आढावा बैठकीमध्ये घेण्यात आल्याचेही परब यांनी सांगितलं. तसेच चाकरमान्यांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा झाली असून त्यासंदर्भातील तपशील मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल असं परब यांनी स्पष्ट केलं आहे. या बैठकीसंदर्भातील माहिती परब यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुनही दिली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी रेल्वे वाहतूक बंद असल्याने यंदा अधिक एसटी बस सोडल्या जाणार असल्याचेही परब यांनी स्पष्ट केलं आहे. कोकणामध्ये चाकरमान्यांना यंदा गणेशोत्सवासाठी परवानगी देण्यात येणार की नाही यासंदर्भात मागील काही दिवसांपासून बराच गोंधळ सुरु आहे. त्यामुळेच आज पालक मंत्र्यांनी  नव्या प्रशासकीय इमारतीत आढावा बैठक घेतली. “कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये तसेच कोकणातील नागरिकांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन कशाप्रकारे उत्सव साजरा करता येईल यासंदर्भात नवीन प्रशासकीय इमारत येथे बैठक घेण्यात आली,” असं परब यांनी ट्वटिरवरुन सांगितलं आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास कमी व्हावा यासाठी करोनासंदर्भातील नियम व अटी निश्चित केल्या जाणार असून त्यावरील अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असेल, असंही परब यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. दरवर्षी गणेशोत्साच्या काळात चाकरमान्यांना गावी जाता यावे म्हणून मोठ्या प्रमाणात विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. मात्र यावर्षी करोनामुळे हे शक्य नसेल. त्यामुळेच यंदा परवानगी मिळाल्यास चाकरमान्यांसाठी विशेष एसटी बसेस सोडल्या जातील, असे परब यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

स्थानिक आमदार विनायक राऊत यांनी, “कोकणात जाणाऱ्यांसाठी अलगीकरणाचा कालावधी १४ च्या ऐवजी ७ दिवस करण्याची मागणी आयसीएमआरकडे शासनामार्फत करणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चाही केली जाईल,” असं मत काही दिवसांपूर्वीच व्यक्त केलं होतं.

प्रवाशांची मागणी काय

करोनाकाळात गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नोकरदारांना राज्य सरकारकडून अद्याप कोणतेच आश्वासन मिळालेले नाही. टाळेबंदीत रेल्वे तसेच राज्य परिवहन मंडळाच्या बसगाडय़ांचे आरक्षणबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यातच गावात प्रवेश करण्याआधी १४ दिवसांचे अलगीकरण करण्याच्या नियमामुळे गणेशभक्तांसमोरील पेच वाढला आहे. त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी कोकण प्रवासी संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. यात १४ ऐवजी सात दिवसांचे अलगीकरण आणि काही प्रमाणात मूळ भाडे आकारुन एसटी व रेल्वे गाडय़ा सुरू करण्यात याव्यात असे या संघटनांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार सुरु

गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघाचे (मुंबई) कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसमोर यंदा मोठी समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. त्यामुळे ८ जुलैला मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे पत्र पाठवल्याचे सांगितले. कोकणात जाण्याआधी चाचणी केल्यास कोणता संशयही राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जडयार यांनीही कोकणासाठी एसटी आणि काही प्रमाणात रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे. एसटीच्या बसगाडय़ा प्रासंगिक कराराऐवजी मूळ भाडेदराने नियमित सोडण्यात याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 5:30 pm

Web Title: will allow devotees to go to kokan says guardian minister anil parab scsg 91
Next Stories
1 “विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड १९’ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाई करा”
2 औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ८ हजार ८८२ वर
3 गडचिरोली : ‘एसआरपीएफ’च्या २९ जवानांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
Just Now!
X