दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केलं आणि देशभरात एकच चर्चा सुरु झाली. यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसं होऊ देऊ नका असं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी काही सेलिब्रिटींचं ट्विट हे समान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यादरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.

दिल्लीच्या सीमांवर मागील दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरुन आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हणत हे प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नका एकत्र राहा असं आवाहन केलं होतं. एकाच वेळी अनेक मान्यवरांच्या अकाऊंटवरुन असे ट्विट करण्यात आल्याने हे ट्विट चर्चेत आले होते. केंद्रातील मोदी सरकारने परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या हॅशटॅग वापरुन मान्यवरांना ट्विट करण्यास सांगितल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र आता या आरोपांची दखल घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यावरुन आता भाजपाने संताप व्यक्त केला आहे. भाजपाचे नेते राम कदम यांनी तर थेट आशापद्धतीने यापूर्वी ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींच्या ट्विटची यादी स्क्रीनशॉर्ट सहीत पोस्ट करत या सेलिब्रिटींच्या ट्विटचीही चौकशी करणार का असा प्रश्न ठाकरे सरकारला विचारला आहे.

महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एक बैठक पार पडली. यामध्ये काँग्रेसकडून सेलिब्रिटींच्या ट्विटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सेलिब्रिटींवर दबाव टाकण्यात आला होता याबद्दल माहिती घ्यावी अशी मागणी काँग्रेसने या बैठकीमध्ये केली. त्यावर अनिल देशमुख यांनी गुप्तहेर विभाग यासंबंधी तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी खासकरुन अक्षय कुमार आणि सायना नेहवालच्या ट्विटचा उल्लेख करण्यात आला. दोन्ही ट्विटमधील साधर्म्य आश्चर्यकारक असल्याचं सांगत यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.

भाजपा आमदार राम कदम यांनी ट्विटरवरुन काही सेलिब्रिटींच्या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट ट्विट केले आहेत. “काँग्रेस आणि महाराष्ट्र सरकारने डोळे उघडून या सर्व सेलिब्रिटी ट्विट्सकडेही पहावे. काँग्रेसच्या भाषेत सांगायचं झालं तर हे सर्व अगदी सारखे आहेत,” असं म्हणत राम कदम यांनी एक स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. यामध्ये राम कदम यांनी अभिनेत्री सोनम कपूर, दिग्दर्शक अनुराग कश्यप, दिग्दर्शक-अभिनेता फरहान अख्तर, अभिनेत्री परिणिती चोप्रा, अभिनेता हृतिक रोशन, अभिनेता अली जफर, पत्रकार रविश कुमार, अभिनेत्री स्वरा भास्कर, काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्यासहीत अन्य काही व्यक्तींना टॅग केलं आहे.

अनेक सेलिब्रिटींना टॅग करत, “आता या सर्व सेलिब्रिटींचीं काँग्रेस आणि महाराष्ट्र सरकार चौकशी करणार का? की चौकशीच्या नावाखाली देशासोबत उभ्या राहणाऱ्या लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार आणि सुनिल शेट्टी यासारख्यांचा छळ करणार? माफी मागत हा तुघलकी निर्णय सराकरने तातडीने परत घ्यावा,” अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

राम कदम यांनी पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये अनेक सेलिब्रिटींनी बोलण्याच्या स्वातंत्र्यासंदर्भात ट्विट करताना एकच वाक्य ट्विट केल्याचं दिसत आहे. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रिटींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरील करोनासंदर्भातील ८ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या भाषणातील मुद्द्यांचा समावेश असणारं ट्विट कोट करुन रिट्विट केल्याचं दिसत आहे.