विधान परिषदेसाठी धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेत होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजप विरुध्द महाविकास आघाडी असा सरळ सामना रंगणार आहे. भाजपकडून माजी मंत्री अमरीश पटेल, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभिजीत पाटील रिंगणात आहेत. पक्षीय बलाबलाचा विचार करता भाजपसाठी ही निवडणूक अवघड नाही.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अमरिश पटेल हे भाजपमध्ये दाखल झाल्याने विधान परिषदेची ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी १डिसेंबरला मतदान होईल, तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपकडून अपेक्षेप्रमाणे अमरीश पटेल यांना संधी देण्यात आली. महाविकास आघाडीने शहाद्याचे अभिजीत पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. एक वर्षांसाठी ही पोटनिवडणूक होत असल्याने काँग्रेसमधून फारसे कोणी उत्सुक नव्हते. त्यात खुद्द अमरीश पटेल यांना ही निवडणूक लढविण्याचे तंत्र चांगलेच अवगत आहे. काँग्रेसने उमेदवारीची माळ शहाद्यात भाजपचे नगराध्यक्ष असलेले मोतीराम पाटील यांचे पुत्र अभिजीत यांच्या गळ्यात टाकली.

धुळे-नंदुरबार विधान परिषदेसाठी एकूण ४३७ मतदार आहेत. पक्षीय बलाबलाचा विचार करता भाजपकडे धुळ्यात १६९, तर नंदुरबारमध्ये ७० अशी एकूण २३९ मते आहेत. महाविकास आघाडीकडे धुळ्यात ६९, नंदुरबारमध्ये १३० अशी एकूण १९९ मते आहेत. एमआयएमकडे पाच मतांचा कोटा आहे. धुळे जिल्ह्य़ातून २३७ तर नंदुरबार जिल्ह्य़ातून २०० मतदार मतदान करू शकणार आहेत. मतदानाला केवळ आठवडा शिल्लक असताना निवडणुकीत अद्याप रंगत आलेली नाही. भाजप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मतदारांसह नेत्यांच्या भेटी घेत आहेत. दोन्ही जिल्ह्य़ात भेटीगाठींना सुरुवात झाली आहे. भाजपच्या पटेल यांनी करोनाच्या नियमांचे पालन करत धुळे जिल्ह्य़ातील मतदारांच्या भेटी, मेळावे घेऊन मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीचे पाटील हे एकटेच मतदारांसह नेत्यांच्या भेटी घेत आहेत. धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि नंदुरबारचे पालकमंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्यासह महाआघाडीतील अन्य नेते ताकदीने प्रचाराला लागले नसल्याचे चित्र आहे. ही बाब भाजपच्या पथ्यावर पडू शकते.

मतदारांच्या गाठीभेटी आणि प्रत्यक्ष संपर्कावर भाजपच्या पटेल यांनी लक्ष केंद्रित केले आहे. भाजप-महाविकास आघाडीत ४० मतांचे अंतर आहे. एमआयएमकडे पाच मतांचा कोटा आहे. महाविकास आघाडीची काहीअंशी भिस्त भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर राहील.

करोनामुळे तेदेखील उपचार घेत आहेत. नंदुरबारमधील सेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी, दोन्ही जिल्ह्य़ांचे पालकमंत्री, भाजपचे नाराज माजी आमदार अनिल गोटे यांची व्यूहरचना काँग्रेसच्या उमेदवारासाठी महत्त्वाची ठरू शकते, परंतु भाजपचे उमेदवार पटेल हेदेखील मूळचे काँग्रेसचे आहेत. ते आर्थिकदृष्टय़ा शक्तिशाली आहेत.

सर्वपक्षीयांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांची नजर काँग्रेस आणि आघाडीतील मतांवर राहील. या एकंदर स्थितीत काँग्रेस ही जागा राखेल की भाजप त्यावर कब्जा करेल हे निवडणुकीतून निश्चित होणार आहे.