मंत्री पंकजा मुंडे यांची स्पष्टोक्ती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीड : सत्तेच्या माध्यमातून चार वर्षांत सार्वजनिक विकासाबरोबरच वैयक्तिक कामेही करण्याचा प्रयत्न केला. पण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पराभव झाला. जिल्हा परिषदेची सत्ता आणली आणि अशक्य वाटणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूकही जिंकली. तरीही मतदारसंघ बदला म्हणून लोक आग्रह करतात. मात्र हा मतदारसंघ दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा गड आहे. तो अबाधित ठेवायचा आहे, अशा शब्दात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मतदारसंघ बदलण्याच्या चच्रेला पूर्णविराम दिला. तर ज्यांच्यावर घरचे लोक विश्वास ठेवत नाही, अशांच्या नादी लागू नका, असा टोला थेट नामोल्लेख न करता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना लगावला.

परळी मतदारसंघातील भाजपच्या बूथ प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत शनिवारी एनएच अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली. या वेळी बोलताना मंत्री मुंडे म्हणाल्या, निवडणूक ही युद्धासारखी असते. यात माझी भूमिका सेनापतीची असून बूथप्रमुख कार्यकत्रे हे सैनिक आहेत. त्यामुळे एखादे काम होईल अथवा नाही पण मनोबल खच्ची होऊ देऊ नका. चार वर्ष सत्तेच्या माध्यमातून सार्वजनिक विकासाची कामे करण्याबरोबरच प्रत्येकाची वैयक्तिक कामेही केली. पीक विमा, कर्ज, अनुदान, आजारी रुग्णांना मदत याद्वारे प्रत्येक घरापर्यंत गेले. पण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पराभव झाला. मात्र ग्रामपंचायत व सोसायटीच्या निवडणुका मोठय़ा संख्येने जिंकल्या. जिल्हा परिषदेची सत्ताही आणली. अशक्य वाटणारी लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकही जिंकली. असे असताना मतदारसंघ बदला म्हणून लोक आग्रह करतात. मात्र परळी मतदारसंघ हा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा गड आहे, तो अबाधित ठेवायचा आहे, अशा शब्दात मतदारसंघ बदलण्याच्या चच्रेला पूर्णविराम दिला. तर ज्यांच्यावर घरचे लोक विश्वास ठेवत नाहीत अशांच्या नादी लागू नका. खोटं बोलणं, पाठीमागून वार करणं आम्हाला जमत नाही.

आमच्यावर कितीही हल्ले झाले तरी आम्ही खंबीर आहोत. आमच्या पराभवाची स्वप्ने कधीच पूर्ण होणार नाहीत, अशा शब्दात थेट नामोल्लेख टाळून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना टोला लगावला. तर खासदार प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा परळी मतदारसंघातील विजय कोणीही रोखू शकत नाही. मात्र मागच्या पेक्षा दुप्पटीने मताधिक्य वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सरचिटणीस सुभाष धस, तालुकाध्यक्ष शिवाजी मुंडे आदि उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will contest from parli vidhan sabha constituency say pankaja munde
First published on: 25-06-2018 at 03:31 IST