सुनील मंत्री रिअ‍ॅलिटीने शाहू मिलच्या जागेबद्दल दिलेल्या नोटिशीचा राज्य शासन कायदेशीर अभ्यास करणार आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्याची मुभा आहे. मात्र राज्य शासन शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहूमहाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करण्यास बांधील आहे, असा पुनरुच्चार राज्याचे संसदीय कामकाजमंत्री तथा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेमध्ये केला. शाहू मिलच्या जागेमध्ये राज्य शासनाने शाहूमहाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करण्याची घोषणा केली आहे. तथापि सुनील मंत्री रिअ‍ॅलिटी या कंपनीने बुधवारी स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहीर नोटीस प्रसिद्ध करून या जागेवर आपला हक्क असल्याचे नमूद करतानाच त्याबाबत कोणीही कसलाही व्यवहार करू नये, असे सूचित केले होते. यामुळे शाहू स्मारकाचे कामकाज थंडावणार की काय, असा प्रश्न शहरवासीयांना पडला होता. कॉमन मॅन संघटनेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
 या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री पाटील म्हणाले, शाहू मिलच्या २६ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याचा शासनाचा निर्णय ठाम आहे. त्यासाठी अभ्यासकांकडून सूचनाही मागविण्यात आलेल्या आहेत. सहा महिन्यांत प्रस्तावित कामाचा अहवाल पूर्ण होईल. तसेच शाहूमहाराजांचे विचार व कार्य जगभर पोहोचावे यासाठी उत्कृष्ट दर्जाची वेबसाईट बनविली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.    कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या कामाची गती व दर्जा समाधानकारक नसल्याची कबुली पालकमंत्री पाटील यांनी दिली. ते म्हणाले, या प्रकल्पाचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मक्तेदार ओसवाल हे कामाबाबत हयगय करीत असले तरी राज्य शासन या महत्त्वाच्या कामामध्ये कोणालाही पाठीशी घालणार नाही. कामाच्या सद्य:स्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी महिन्याभरात सादर करावा, अशी सूचना त्यांना दिली आहे. शाहूजयंतीच्या पूर्वी हे काम पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त करून मंत्री पाटील यांनी पुरातत्त्व विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तरीत्या हे काम गतीने पूर्णपूर्ण करावे, अशी सूचना केली.