गर्दीने फुललेला मंडप, खेडय़ा-पाडय़ांमधून विवाहस्थळी येणारे वऱ्हाडी मंडळींचे जथ्थे आणि अलोट जनसमुदायाच्या साक्षीने नव वधू-वरांच्या बांधलेल्या रेशीमगाठी अशा वातावरणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेचा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी येथे पार पडला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शिवसेनेने हाती घेतलेल्या या उपक्रमाचा पहिलाच सोहळा घेण्याचा मान परभणीला मिळाला. यात तब्बल ३३३ जोडपी विवाहबद्ध झाली. ‘तुम्ही दिलेली सत्तेची ताकद तुमच्या चरणी समर्पित करण्यास आलो आहे’, असे उद्गार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वेळी काढले.  परभणीच्या इतिहासात हा सोहळा अपूर्व व अद्वितीय ठरला. गेल्या अनेक दिवसांपासून या सोहळ्याच्या आयोजनासाठी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह सेनेचे प्रमुख पदाधिकारी प्रयत्नशील होते. गावोगावी या सोहळ्याची निमंत्रणे देण्यात आली. सकाळपासूनच वऱ्हाडी मंडळी दाखल होण्यास प्रारंभ झाला. वाहनांचे जथ्थे विवाहस्थळी येऊ लागले. लग्नाचा मुहूर्त दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी होता. पण, त्याआधीच विवाह मंडप गर्दीने तुडुंब भरला. जिंतूर रस्त्यावरील नूतन विद्यालयाच्या भव्य प्रांगणात उभारलेल्या मंडपात एक तास आधीच पाय ठेवायलाही जागा नव्हती. शहराच्या सर्व बाजूंनी वऱ्हाडी मंडळी शेवटपर्यंत मंडपाकडे दाखल होत होती. त्यामुळे रस्ते चहुबाजूंनी गर्दीने फुलून गेले. मंडपाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वाहनांची रीघ लागल्याने वाहतुकीत मोठा खोळंबा निर्माण झाला.

मुख्य व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंनी वधू-वरांसाठी भव्य व्यासपीठ उभारले होते. दुपारी एकनंतर उद्धव ठाकरे यांचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह आगमन झाले. आयोजक खासदार जाधव, आमदार डॉ. पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, संजय कच्छवे, संपर्कप्रमुख आमदार सुभाष भोईर, औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार जयप्रकाश मुंदडा, प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, माजी आमदार विजय गव्हाणे, हरिभाऊ लहाने, मिराताई रेंगे, शेतकरी संघटनेचे लक्ष्मण वडले, महापौर संगीता वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे आदी या वेळी उपस्थित होते. प्रारंभी बौद्ध वधू-वरांचे विवाह विधिवत पार पडले. यानंतर मंगलाष्टकांच्या निनादात सोहळा पार पडला. वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थितांनी प्रचंड गर्दी केली होती.

सत्तेची ताकद जनतेच्या चरणी

निवडणुकीत मते मागण्यासाठी आम्ही दारोदार जातो. लोक मते देतात, पण मतदान झाल्यानंतर तुमची-आमची ओळखच नाही, असे चित्र दिसून येते. ही राजकारणातील परंपरा मोडायची आहे. अशी परंपरा चुलीत टाकून तुम्ही दिलेली सत्तेची ताकद तुमच्याच चरणी अर्पण करण्यास आलो आहोत, असे उद्गार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात, याची आता चर्चा करण्यापेक्षा किंवा दुखाची कोणतीही गोष्ट करण्यापेक्षा केवळ तुमच्या पाठीशी शिवसेना खंबीर आहे हे सांगण्यासाठीच आपण आलो.   तुमच्या पाठीशी शिवसेना खंबीर आहे हे सांगण्यासाठीच आपण आलो. आम्ही सर्वजण तुमचे कुटुंबीय बनून तुमच्यासोबत राहू. संकटे येतात जातात. संकटांचा मुकाबला आपण सगळे मिळून करू.