पुण्यातील भाजपाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. ‘माझी आणि मुख्यमंत्र्यांची मैत्री कायम राहणार आहे. माझे मन इथे रमले नाही म्हणून मी काँग्रेसमध्ये जात असून मी माझी भूमिका मुख्यमंत्र्यांना सांगितली आहे’, असे खासदार संजय काकडे यांनी या भेटीनंतर सांगितले.

गेल्या साडे चार वर्षापासून भाजपाची बाजू शहरात चांगल्या प्रकारे मांडणारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे पुण्यातील भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. पुणे हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला होता; पण गेल्या लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यंदा भाजपने युवा नेत्यांना संधी देण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक असलेले संजय काकडे हे नाराज झाले.

संजय काकडे यांनी 10 मार्च रोजी पुण्यातील वैशाली हॉटेल येथे पुणे कट्टा अंतर्गत शहरातील राजकीय घडामोडीवर भाष्य करताना काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या घडामोडी ताज्या असतानाच सोमवारी संध्याकाळी उशिरा संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आणि राजकीय पटलावर तर्कवितर्कांना उधाण आले. अखेर संजय काकडे यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले. ‘मी काँग्रेसमध्ये जातोय हेच सांगण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमची मैत्री कायम राहणार आहे’, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे राज्यसभा खासदार होण्यापूर्वी पासून मैत्रीचे संबंध होते. त्यानंतर पक्षाच्या अनेक जबाबदार्‍या पार पाडल्या. पण भाजपा प्रदेश आणि स्थानिक कार्यालयाच्या कारभाराला कंटाळून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या निर्णयावर ठाम आहे, असे त्यांनी सांगितले.